17 हजार कोटी उभारण्याची तयारी : कंपनीची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बहुप्रतिक्षीत टाटा समूहातील टाटा कॅपिटल कंपनीचा आयपीओ अखेर 6 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. कंपनीने यासंदर्भातील माहिती शेअर बाजाराला दिली. टाटा कॅपिटल सदरच्या आयपीओतून 17 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभी करणार असल्याचे सांगितले जाते. संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा अँकर गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये 3 ऑक्टोबर रोजी गुंतवणूक करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या आयपीओअंतर्गत कंपनी 21 कोटी ताजे समभाग शेअरबाजारात विक्री करता उपलब्ध करणार आहेत. रिटेल गुंतवणुकदारांसाठी 6 ऑक्टोबर रोजी आयपीओ खुला होईल. टाटा कॅपिटलने आयपीओकरिता 317 ते 326 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित केली आहे. 50 टक्के संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी आयपीओ राखीव असणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी कंपनीचे समभाग बाजारात सूचीबद्ध होतील.









