8 ऑक्टोबरला आयपीओ बंद : 4641 कोटी जमवले
वृत्तसंस्था/ मुंबई
बहुप्रतिक्षित अशा टाटा कॅपिटलचा आयपीओ सोमवारी शेअर बाजारामध्ये खुला झाला असून तो 8 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असणार आहे. शेअर ग्रे मार्केटमध्ये 3 टक्के वधारासह कार्यरत असून पहिल्या दिवशी हा आयपीओ 39 टक्के इतका सबस्क्राइब झाला होता.
आयपीओपूर्वी उभारली रक्कम
कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 15512 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजले आहे. याच दरम्यान शुक्रवारी अँकर गुंतवणूकदारांनी जवळपास 4641 कोटी रुपये जमा करण्यामध्ये यश मिळवले आहे. या कॅलेंडर वर्षात पाहता टाटा कॅपिटलचा आयपीओ हा सर्वाधिक मूल्याचा असणार आहे. मागच्या वर्षी ह्युंडाई मोटर इंडियाचा आयपीओ 27 हजार 859 कोटी रुपयांचा होता. या आयपीओकरता 310 ते 326 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली असून कंपनीचा समभाग 13 ऑक्टोबरपासून बीएसई आणि एनएसईवरती सूचिबद्ध होणार आहे.
कोण आहेत दिग्गज गुंतवणूकदार
या आयपीओमध्ये विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी एलआयसी सर्वात मोठी अँकर गुंतवणूकदार म्हणून सहभागी झाली आहे. जागतिक स्तरावर पाहता मॉर्गन स्टॅनले, गोल्डमॅन सॅच, सिटी ग्रुप, अमान्सा होल्डिंग्ज, नोम्युरा, गव्हर्मेंट पेन्शन ग्लोबल फंड, डब्ल्यूसीएम इन्वेस्टमेंट, एनएफयु म्युच्युअल ग्लोबल अल्फा फंड, अशोका व्हाइटओक, मार्शल वेश, अमुंडी फंडस् आणि ऑलस्प्रींग ग्लोबल इन्वेस्टमेंट अशा विविध कंपन्यांनी यामध्ये भाग घेतला होता.
देशातील 18 म्युच्युअल फंडही सहभागी
यासोबतच 18 देशांतर्गत म्युच्युअल फंड हाऊस यांनी सुद्धा यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यामध्ये व्हाइटओक कॅपिटल, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफ, एचडीएफसी एएमसी, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी, अॅक्सिस म्युचल फंड, निप्पॉन लाईफ, इडलवाइस, कोटक महिंद्रा, मोतीलाल ओसवाल एएमसी, युटीआय एएमसी, बंधन एमएफ अशा विविध म्युच्युअल फंड कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.









