रस्त्यात उभे करण्यात आल्याने वाद, संशयित ताब्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्व्हिस रोडवर उभे करण्यात आलेले टाटा एस वाहन पेटविण्यात आले आहे. मातंगी गल्ली, होनगा ता. बेळगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. रेणुका राऊत यांच्याशी संबंधित हे वाहन आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वाहन पेटविण्यात आले आहे. या घटनेत सुमारे 5 लाख रुपयांहून अधिक किमतीची आर्थिक हानी झाली आहे. रोजीरोटीचे साधन असलेले वाहन जळत असताना वाहनमालक व त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश क्यक्त केला.
घटनास्थळाजवळच एक मोबाईल आढळला आहे. त्यामुळे वाहन कोणी पेटविले, याची माहिती मिळाली असून त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार रस्त्यावर वाहन का उभे केले? या कारणावरून सुरुवातीला भांडण झाले होते. भांडणानंतर ते पेटविण्यात आले आहे. शनिवारी रात्री काकती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता होनगा येथे घटना घडली आहे. मात्र, यासंबंधी अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात यासंबंधीचे लोक ठाण मांडून होते. एफआयआर दाखल झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.









