तासगाव :
तासगाव तालुक्यात गेल्या चार दिवसात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यासह तासगाव तालुक्यात मान्सून वेळेवर येईल या आशेवर शेतकरी आहे. पेरणीसाठी शेताची मेहनत करून तो जूनला पेरणीच्या तयारीत आहे. तालुक्यात ३१ हजार ५०० हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. यामध्ये ज्वारीचे १४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. पावसासोबत यावर्षी तासगाव तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांना खरीपाचे मार्गदर्शन करून सज्ज आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तासगाव तालुक्याने दुष्काळाच्या भीषण झळा याअगोदर सोसल्या आहेत. सातत्याने पाठलाग करणाऱ्या दुष्काळामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला होता. मात्र उन्हाळी पाऊस यावर्षीही चांगला पडला. यामुळे द्राक्षशेतीसह खरिपाच्या मेहनतीस चांगला फायदा झाला आहे. तालुक्याने पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागी होत श्रमदान करून पाणी जिरवले. त्याचे फलीत म्हणून गेली तीन वर्षे तालुक्यात पाणीटंचाई जाणवली नाही. उन्हाळी पावसामुळे शेतीच्या मशागतीसाठी ग्रामीण भागात लगबग सुरू आहे. तर खते, बियाणे, पीक प्रात्यक्षिक, माती परीक्षण व विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. गावोगावी प्रबोधन सुरू आहे. मात्र मान्सून वेळेवर आला तर पावसामुळे यंदा खरिपाला चांगले दिवस येणार असे आशादायक चित्र पहावयास मिळत आहे.
- बीज प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन
खरीप बीज प्रक्रियेची प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देण्याचे काम गावोगावी सुरू आहे. त्यांनी बीज प्रक्रिया कशी करावी? का करावी? कशासाठी करावी? व बीज प्रक्रिया केल्यानंतर होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले जात आहेत. बीज प्रक्रिया ही पेरणी आधी तीन ते चार तास आधी करावी प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करावी यात हेक्टरी बियाण्यांकरीता बाविस्टीन व थायरम याची प्रक्रिया करावी. त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करावी. यामध्ये ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पी एस बी व सल्फरचा वापर करण्यात आला. या बीज प्रक्रियेमुळे पिकावरील कीड रोग कमी होऊन उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते असे सांगण्यात आले.








