लोकसभेत परस्परांसंबंधी टिप्पणी : जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून आमने-सामने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर हे परस्परांशी जातनिहाय जनगणनेच मुद्द्यावरून भिडले आहेत. दोघांदरम्यान जोरदार वाकयुद्ध झाले अणि यादरम्यान सप खासदार अखिलेश यादव यांनी राहुल गांधींचे समर्थन करत सत्तारुढ पक्षावर निशाणा साधला.
लोकसभेतील अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ठाकूर यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाशी संबंधित माजी पंतप्रधानांचा आणि त्यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचा उल्लेख केला. काँग्रेसच्या शासनकाळात हलवा कुणाला मिळाला हे मी विचारू इच्छितो. काही लोक ओबीसीबद्दल बोलतात, त्यांच्याकरता ओबीसीचा अर्थ ओनली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन असा होता. ज्याला स्वत:ची जात माहित नाही तो गणनेबद्दल बोलत असल्याची टिप्पणी ठाकूर यांनी केल्यावर राहुल गांधी संतापल्याचे दिसून आले.
ज्याप्रमाणे मदारीच्या खांद्यावर माक असते, त्याप्रमाणेच राहुल गांधी यांच्या खांद्यावर असत्याचे बंडल असते असे ठाकूर यांनी म्हणताच सभागृहात काँग्रेस खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना ठाकूर यांचा प्रतिवाद करण्याची अनुमती दिली.
राहुल गांधींकडून आरोप
अनुराग ठाकूर यांनी मला शिवी दिली आहे, माझा अपमान केला आहे, परंतु त्यांच्याकडून मला माफी नको, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तर ठाकूर यांनी राहुल गांधींना एलओपी (विरोधी पक्षनेते)चा फूल फॉर्म लीडर ऑफ अपोजिशन असतो, लीडर ऑफ प्रोपेगेंडा नाही हे माहित असावे, काँग्रेस पक्षाने मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे सुनावले आहे.
जातनिहाय जनगणना करविणारच : राहुल गांधी
दलितांसंबंधी जो बोलतो, त्याला शिव्या ऐकाव्याच लागतात. मी या शिव्या आनंदाने स्वीकारतो. महाभारतात ज्याप्रमाणे अर्जुनाला केवळ माशाचा डोळा दिसत होता, त्याप्रमाणे आम्ही जातनिहाय जनगणनेवर लक्ष केंद्रीत करून आहोत. आम्ही जातनिहाय जनगणना करविणारच. याकरता मला कितीही शिव्या दिल्या तरी चालेल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
अखिलेश यादवांचीही उडी
राहुल गांधी यांच्या शाब्दिक प्रत्युत्तरानंतर सभागृहात पुन्हा गोंधळ सुरू झाल्यावर अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले जगदंबिका पाल यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. यादरम्यान अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांचे समर्थन करत केंद्र सरकारला लक्ष्य केले. सभागृहात कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर सभापतींनी सभागृहात कुणीच कोणाची जात विचारणार नसल्याचे स्पष्ट केले.









