29 हजार 29 फुट उंचीचे आव्हानात्मक माऊंट एव्हरेस्ट केले सर
कोल्हापूर प्रतिनिधी
अतिशय खडतर, आव्हानात्मक आणि 29 हजार 29 फुट उंचीचे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची अद्वितीय कामगिरी कोल्हापूरची 20 वर्षीय जांबाज गिर्यारोहक कस्तुरी सावेकरने शनिवारी करुन दाखवली. शनिवारी सकाळी 6 वाजता एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवून देशाचा तिरंगा फडकवत भारत माता की जय असा नारा दिला. कस्तुरीने एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी देशातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक म्हणून मान मिळवला आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यातच गिर्यारोहक कस्तुरी सावेकरने माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवण्यासाठी 25 हजार 300 फुटांपर्यंतची मोठय़ा धाडसाने चढाई केली होती. याचवेळी तिला एव्हरेस्ट शिखराकडे जाण्यासाठी आवश्यक असलेली वेदर विंडोसुद्धा मिळाली होती. तसेच तिला एव्हरेस्ट सर करण्यासाठी केवळ 3 हजार 729 फुटांची चढाई करायची होती. पण पुढील काहीच तासांतच वातावरणात बिघाड होऊन रौद्ररुप वाटावा असा वारा, जीवघेणी हिमवृष्टी व पाऊस यामुळे कस्तुरीला एव्हरेस्ट शिखराच्या दिशेने करावी लागणारी चढाई थांबवून माघारी परतावे लागले हेते. पण खचून न जाता तिने पुन्हा परिश्रम घेतले. त्याच्या जोरावर तिने गेल्या मार्च महिन्यात एव्हरेस्ट-2 मोहीम हाती घेतली.
एव्हरेस्टच्या बेस पॅम्पवरुन 9 मे रोजी सायंकाळी 7 वाजता अतिशय संयमाने शिखराच्या दिशेने चढाईला सुरुवात केली. सोबत कृत्रिम ऑक्सिजनचे सिंलिडरही घेतले होते. त्याच्या सहाय्याने अतिशय चिंचोळा मार्ग, हजारो फुट खोल दऱ्या अतिशय वेगाने वाहणार वारा व या वाऱ्या सोबतची बर्फवृष्टी अशा सगळ्या महासंकटांचा तीने मोठय़ा जिकरीने सामना करत शनिवारी सकाळी 6 वाजता एव्हरेस्ट शिखर सर करुन देशाचा तिरंगा लहरला. पुढील काही सेकंद भारत माता की जय असा नारा देत परतीचा मार्ग धरला.









