ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चिंतामणी शांताराम तोरसकर (८०) यांचे रविवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या सावंतवाडी सबनीसवाडा येथील निवासस्थानी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी जात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत तोरसकर कुटुंबियांचे सांत्वन केले. सायंकाळी उपरलकर सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या चिंतामणी तोरसकर यांनी सुरुवातीला कळणे हायस्कूलमध्ये सेवा बजावली. या स्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यामुळेच कोलगावात माध्यमिक शिक्षणाची सोय झाली. मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर तसेच सामाजिक कार्यकर्ते कोलगाव येथील जिमचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांचे ते वडील तर मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका ज्योती तोरसकर यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.









