कारिवडे देवस्थान कमिटीची मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी
ओटवणे | प्रतिनिधी
कारिवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी कालिका मंदिराच्या सुशोभिकरणासह भक्तांच्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी देवी काळकाई देवस्थान उपसमितीच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी हा देवस्थानच्या स्नानगृहासाठी मंजुर असलेला निधी तात्काळ देण्याबाबत कोल्हापूर पश्चिम देवस्थान व्यवस्थापन समितीशी संपर्क साधुन तसेच जिल्हा नियोजन मधुन या मंदिराच्या सुशोभिकरणासह स्वच्छतागृहासाठी निधी देण्याची ग्वाही दिली.
याबाबत मंत्री दीपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनानुसार १८९४ मध्ये कालिकादेवी मंदिराचा जीर्णोद्धारभाविकांच्या देणगी आणि लोकवर्गणीतून कऱण्यात आला. परंतु गेल्या दोन वर्षापासून या मंदिराच्या कळसाचा भाग लिकेज झाल्याने पावसाळ्यात त्यातुन पाणी पाझरत आहे. तात्पुरती पर्यायी व्यवस्था करूनही गळती थांबलेली नाही. त्यामुळे मंदिराच्या कळसावर पत्र्याचे छप्पर साकारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच मंदिराच्या परिसरात स्वच्छतागृह नसल्यामुळे ५०० मीटर अंतरावर ग्रामपंचायतकडे भाविकांना जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी स्वच्छतागृहासह मंदिर सुशोभिकरणासाठी निधी द्यावा. तसेच मंदिराकडे स्नानगृह बांधण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी कडून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र त्याची कार्यवाही होत नसल्याने याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी मंदिराच्या कळसावर पत्र्याच्या छप्परासह स्वच्छता गृह आणि मंदिर सुशोभिकरणासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्याचे आश्वासन देवस्थान कमिटीच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी कडून स्नानगृहासाठी मंजूर असलेल्या निधी देण्याबाबत कमिटीचे सचिव असलेले कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची संपर्क साधून कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.यावेळी श्री देवी काळकाई देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बाबाजी गावकर, सचिव दत्ताराम गावडे, सदस्य मनोहर गुरव, कृष्णा परब, शरद परब, शंकर मेस्त्री, शंभा खडपकर तसेच कारीवडे शिवसेना उपविभागप्रमुख रवी परब आदी उपस्थित होते.