रेल्वे प्रवाशांमधून नाराजीचा सूर
नीलेश परब / न्हावेली
सावंतवाडी रेल्वे स्थानक सुशोभिकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे.यामुळे या रेल्वे स्थानकाला आता विमानतळासारखा नवा लूक प्राप्त झाला आहे.यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ६ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यासाठी विशेष प्रयत्न करुन निधी उपलब्ध करुन दिला आणि तातडीने या कामांची पूर्तता सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांनी करुन घेतली आहे.अशाप्रकारे सावंतवाडी रोड रेल्वेस्थानक हायफाय झाले असले तरी रेल्वे टर्मिनसच्या कामाबाबत तसेच रेल्वे टर्मिनसला प्रा.मधु दंडवते यांचे नाव देण्याबाबतही निर्णय होत नसल्याने रेल्वे प्रवासी व तालुकावासीयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक अंतर्गत रस्त्याचे कॅाक्रीटीकरण,फूटपाथ,आरसीसी गटार,सरक्षंक भिंत,प्रवेशद्वार,कमान,बसथांबा,रिक्षा थांबा,बागकाम व इतर सुशोभिकरण कामे करण्यात आली आहेत.यामुळे सावंतवाडी रेल्वेस्थानकाचे रुपडे पालटले आहे.रेल्वे स्थानकावरील सुशोभिकरणामुळे एअरपोर्टचा लूक आला आहे.कोकणात येणाऱ्या पर्यटकांसह चाकरमान्यांसाठी हे खास आकर्षण ठरणार आहे.स्थानकाला आलेली नवी झळाळी निश्चितच मनाला भुरळ घालणारी आहे.
….. स्टेशनला टर्मिनस दर्जा कधी मिळणार ?
सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनच्या बाह्यभागाचे सुशोभिकरण झाले असून विमानतळाचा लूक या स्टेशनला मिळाला असला तरी या स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांची संख्या अत्यंत नगण्य आहे.सुपर एक्सप्रेस बऱ्याच गाड्या या स्टेशनला बाय बाय करुन सुसाट जातात.यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे.गोवा राज्याला दोन थांबे रत्नागिरी जिल्ह्याला दोन थांबे असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र एकच थांबा कणकवली येथे आहे.दुसरा थांबा हा सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनला मिळावा अशी मागणी आहे.त्याचबरोबर रेल टेल हे हॅाटेल कधी उभारले जाणार आहे.अनेक एक्सप्रेस आणि सुपर एक्सप्रेस रेल्वे गाड्या याठिकाणी थांबून टर्मिनस दर्जा कधी दिला जाणार ? असा प्रश्न प्रवासी संघटनांकडून विचारला जात आहे
…… प्रा.मधू दंडवतेंच्या नावाची मागणी !
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधु दंडवते यांच नाव देण्याची मागणी आहे.तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना याठिकाणी थांबा देण्यात यावा व रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी शासनाकडे केली आहे.तर सुशोभिकरणासाठी सरकारला धन्यवाद दिले जात असताना प्रा.मधू दंडवते यांचे नाव रेल्वेस्थानकाला देण्याच्या मागणीला जोर वाढू लागला आहे.









