दैनिक तरुण भारत संवादने
सा. बां. खात्याचे वेधले होते लक्ष
ओटवणे | प्रतिनिधी
चराठा – ओटवणे घाटरस्त्या दरम्यान गेल्या पावसाळ्यात खचलेल्या मोरीच्या ठिकाणी संरक्षक भिंतीसह नवीन मोरीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या मोरीच्या धोकादायक स्थितीकडे दैनिक तरुण भारत संवादने त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे पाठपुराव्यासह लक्ष वेधल्याने तात्काळ यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. आता या कामास सुरुवात झाल्यामुळे वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.गेल्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही मोरी एका बाजूने खचली होती. या खचलेल्या मोरीच्या बाजूने सुमारे ४० फूट खोलदरी आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात ही मोरी आणखी खचून ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक ऐन पावसाळ्यात ठप्प होण्याची शक्यता होती. पावसाळ्यात या घाट रस्त्याला निर्माण झालेला धोका ओळखून त्यावेळी तरुण भारतने याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधून तात्पुरत्या डागडुजीसह ही मोरी निर्लेखित करून संरक्षक भिंतीसह नवीन मोरीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता पी . आर. लोहार यांनी याची तात्काळ दखल घेत घटनास्थळी जात पाहणी केली. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरत्या उपाययोजना करीत संरक्षक भिंतीसह नवीन मोरीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवला.ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. ओटवणे जनतेला सावंतवाडीत येण्या जाण्यासाठीही हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र या घाटीतील खचलेल्या मोरीमुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे होता. मात्र आता या ठिकाणी संरक्षक भिंतीसह नवीन मोरीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ निधी मंजूर करीत काम हाती घेतल्यामुळे वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.









