तर्कतीर्थांच्या शिक्षण पद्धतीचे-त्यांच्या विचारांचे अनुकरण आवश्यक
बेळगाव : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे ज्ञानाचे ‘रोलमॉडेल’ होते. भारताने तर्कतीर्थांच्या शिक्षण पद्धतीचे आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करून ज्ञानव्यवस्था बदलल्यास आपण अभिमानाने ‘मेरा भारत महान’ असे म्हणून शकतो, असे प्रतिपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : जीवन आणि कार्य’ या विषयावर ते बोलत होते. या व्याख्यानाला राज्य मराठी विकास संस्थेचे अनुदान लाभले.
डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, तर्कतीर्थ व बेळगावचा जुना संबंध आहे. 1949 मध्ये देश गणनेच्या अनुषंगाने ते बेळगावला आले होते. त्यांच्या व्याख्यानाला 10 हजार श्रोते उपस्थित होते, ज्याचे समालोचन अॅड. राम आपटे यांनी केले होते. कोणत्याही शाळेमध्ये न जाता तर्कतीर्थांनी एक नवीन ज्ञानव्यवस्था निर्माण केली, हे आश्चर्यकारक आहे. त्यांचे वडील हे जोशपणाचा (पत्रिका पाहणे, मुहूर्त काढून देणे) व्यवसाय करत. मात्र आपल्या मुलाने तो करू नये यासाठी त्यांनी तर्कतीर्थांना संस्कृत पंडित बनविण्याचे ठरविले. त्यांना लिहायला, वाचायला शिकविले आणि वाईच्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये ते वेदाध्ययन करण्यास आले.
वाईमध्ये तेव्हा 350 घरांमध्ये परंपरेने वेदाध्ययन चालत असे. याच ठिकाणी त्यांना विनोबा भावे भेटले. त्यांनी तुझ्या बुद्धीचा विकास होण्यासाठी इंग्रजी शिकणे आवश्यक आहे, असे बिंबविले, आणि तर्कतीर्थांनी इंग्रजी भाषा अवगत केली. तर्कतीर्थ म्हणतात, भारतीय व विदेशी तत्त्वज्ञानामध्ये मूलभूत फरक आहे. विदेशी तत्त्वज्ञान लोकशाही मूल्ये जपतो तर भारतीय सनातनीच आहेत, हे लक्षात आल्यावर माणसाला शहाणे करायचे तर धर्म व समाज सुधारणा आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक ब्रह्मसभेमध्ये जाऊन त्यांनी आपली मते मांडली. परंतु त्यांना विरोधच झाला. भारतामध्ये धर्म सुधारणा अशक्य असल्याने त्यांनी समाज सुधारणेकडे आपले लक्ष वळविले, असे डॉ. लवटे यांनी नमूद केले.
देश प्रगल्भ होण्यासाठी छोटी छोटी क्रांती आवश्यक आहे, असे तर्कतीर्थ मानत. कायदे भंग चळवळीमुळे तर्कतीर्थ तुरुंगात गेले व तेथे त्यांची मानवेंद्र रॉय या सशस्त्र क्रांतीच्या पुरस्कर्त्याची भेट झाली. तथापि क्रांती हा आपला (भारतीयांचा) स्वभाव नाही तर परिवर्तन हा आपला स्वभाव आहे हे त्यांच्या लक्षात आले. तर्कतीर्थांच्या बुद्धीचा आवाका लक्षात आल्याने यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना खासदार, मंत्री किंवा मराठी विकास व साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद अशा तीन पदांचा प्रस्ताव ठेवला. यापैकी शेवटचा प्रस्ताव तर्कतीर्थांनी स्वीकारला, असे डॉ. लवटे म्हणाले.
महाराष्ट्र सुधारायचा असेल तर सर्व ज्ञान मराठीत आले पाहिजे, असा विचार करून या पदावरून त्यांनी मराठीतील सर्व प्राथमिक कोष तयार केले. 1960 ते 1980 दरम्यान जगात जे जे अभिजात साहित्य होते, ते मराठीमध्ये आणले. 1962 पासून त्यांनी सुरू केलेले कोष लेखन 2015 मध्ये पूर्ण झाले व 2020 मध्ये त्याचे 20 खंड पूर्ण झाले. कोष लेखनाची पद्धत तर्कतीर्थांनी विकसित केली. 2005 मध्ये विश्वकोषाचे डिजिटलायझेशन केले, अशी माहिती त्यांनी दिली.
भारताने बुद्धी प्रामाण्यता स्वीकारल्याशिवाय विकास अशक्य आहे, या मतावर तर्कतीर्थ ठाम होते. त्यांच्याकडे ज्ञानाचे एक रोलमॉडेल म्हणूनच पाहायला हवे. त्यांचे अनुकरण करून ज्ञानव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न झाल्यास ‘मेरा भारत महान’ असे आपण अभिमानाने म्हणून शकतो, असे सांगून त्यांनी समारोप केला. प्रारंभी अक्षता मोरे यांनी स्वागतगीत सादर केले. अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन करून परिचय अश्विनी ओगले यांनी करून दिला.









