ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताकडून अक्षय ऊर्जा उपकरणांच्या निर्यातीवर अमेरिकेतील वाढीव शुल्काचा कोणताही मोठा परिणाम सरकारला दिसत नाही. असे नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी आज सांगितले ‘अमेरिकेला आमची पवन टर्बाइनची निर्यात फारशी जास्त नाही. अमेरिकेच्या बाजारपेठेत आमची सौर सेल आणि पॅनेलची निर्यातही फारशी जास्त नाही. त्यामुळे कोणताही मोठा परिणाम होणार नाही. याशिवाय, देशांतर्गत बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे, अमेरिकेतील वाढत्या शुल्काचा देशांतर्गत उद्योगावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, असे सारंगी यांनी येथे एका उद्योग कार्यक्रमात बोलताना सांगितले.
7 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता स्थापणार : जोशी
या कार्यक्रमात, नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, भारताची पवन ऊर्जा क्षमता 2014 मध्ये 21 गिगावॅटवरून 52.2 गिगावॅट झाली आहे आणि 30 गिगावॅट क्षमतेचे प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत. चालू आर्थिक वर्षात भारत 6 गिगावॅट ते 7 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता स्थापित करण्याची शक्यता आहे.









