सर्वसामान्यांच्या शंकांचे होणार निरसन
बेळगाव : नागरिकांना वीज दरपत्रकाची माहिती व्हावी, या उद्देशाने यापुढील वीजबिलामागे दरपत्रक छापले जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून दिल्या जाणाऱ्या वीजबिलामागे आवश्यक सूचना, शहरी व ग्रामीण भागासाठी आकारल्या जाणाऱ्या बिलाची रक्कम याची माहिती दिली जाणार आहे. वीजबिलाच्या मागील बाजूला यापूर्वी जाहिराती छापल्या जायच्या. त्यानंतर ऑनलाईन वीजबिल कसे भरावे? याची माहिती दिली जात होती. काही महिन्यांपूर्वी विजेचा धक्का लागू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, तक्रारी कोठे मांडाव्यात? याची माहिती असायची. आता यापुढे वीज दरपत्रक दिले जाणार आहे. निर्धारित युनिटनुसार आकारला जाणारा दर यामध्ये आहे. वीजबिल कमी अथवा जास्त का आले? याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते. महिनाभरात वापरलेल्या विजेच्या युनिटचा दर दरपत्रकानुसार पाहिल्यास बिलाची माहिती मिळू शकते. सर्वसामान्यांना त्वरित ही माहिती मिळावी, या उद्देशाने दरपत्रक दिले जाणार आहे.