गतवर्षीच्या तुलनेत यंदा क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता : कृषी खाते सज्ज
बेळगाव : यंदा कृषी खात्याने राज्यात 80 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात 7.30 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी खात्याने बी-बियाणे, खते, कीटकनाशके आणि यंत्रसामुग्री सज्ज केली आहेत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा 25 टक्के पेरणी क्षेत्रात वाढ होणार आहे. त्याबरोबर बी-बियाणे आणि खताच्या मागणीत 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील चार दिवसांपासून अधुनमधून वळीव पाऊस पडत आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बळीराजाही सुखावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे वेळेत पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी आशाही कृषी खात्याने व्यक्त केली आहे.
बी-बियाणे -खताच्या मागणीत वाढ
राज्यात बियाणे आणि खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी खात्याने खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या आहेत. सुमारे 15 लाख मेट्रिक टन खत आणि 1.10 लाख टन बी-बियाण्यांचा साठा करण्यात आला आहे. बेळगाव, विजापूर, हावेरी, धारवाड, गदग, कोप्पळ, बिदर, कलबुर्गी, बळ्ळारी, तुमकूर, कोलार, चिक्कबळ्ळापूर, मंड्या, म्हैसूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, यासह इतर जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार तृणधान्य आणि कडधान्य बियाणे उपलब्ध केली जाणार आहेत. संशोधन केलेल्या नवीन बियाणांमध्ये जास्त ओलावा सहन करण्याची क्षमता नसते. त्यामुळे जमिनीत अधिक प्रमाणात ओलावा निर्माण झाल्यास उत्पादनात घट होते. विशेषत: घरी पारंपरिकपणे साठवणूक केलेले बियाणे पेरणीसाठी उत्तम असते. नवीन बियाणांमुळे नुकसान होत आहे. अशी माहितीही काही शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अनावश्यक वितरित करण्यात येणारी बियाणे कशासाठी? असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात खरीप हंगामामध्ये भुईमूग, बाजरी, हरभरा यासह इतर विविध पिकांची पेरणी केली जाते. मान्सूनच्या पावसावरच या पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. कडधान्य बियाणांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बियाणे संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अशी माहितीही कृषी विभागाने दिली आहे.
59 लाख क्विंटल बियाणाचा साठा
बेळगाव जिल्ह्यात 7.29 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या होत असलेल्या वळीव पावसामुळे शेती मशागतीला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होण्याची शक्यता आहे. 59 लाख क्विंटल बियाणे आणि 1 लाख मेट्रिक टन खताचा साठा करण्यात आला आहे.
– शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)









