अनंतनागमध्ये एका नागरिकाची हत्या : पोलिसांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू
वृत्तसंस्था/ अनंतनाग
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव दीपू असून तो उधमपूरचा रहिवासी होता आणि अनंतनागमध्ये काम करत होता. दीपूची हत्या केल्यावर दहशतवाद्यांनी पलायन केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. तसेच घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेत परिसरातील बंदोबस्त वाढविला आहे.
अनंतनागमध्ये एका निर्दोष नागरिकावरील हल्ल्यामुळे अतीव दु:ख झाले. दु:खाच्या या घडीला संबंधिताच्या कुटुंबीयासोबत माझ्या संवेदना आहेत. जम्मू-काश्मीरसंबंधी केंद्र सरकारच्या धोरणाचे अपयश या घटनेतून दिसून येत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सर्वसामान्यांना लक्ष्य करण्यात आल्याची ही पहिलीच घटना नव्हे. फेब्रुवारीत दहशतवाद्यांनी पुलवामा येथे एका काश्मिरी पंडिताची हत्या केली होती. गावात सुरक्षारक्षकाचे काम करणारे संजय शर्मा यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
मागील वर्षी शोपियांमध्ये मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवासी असलेल्या दोन मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. शोपियांच्या हरमेन भागात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात मोनीश कुमार आणि राम सागर या दोघांना जीव गमवावा लागला होता. तर ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी एका मजुराची हत्या केली होती. बिहारच्या मधेपुराचा रहिवासी असलेल्या जुलाहा मोहम्मद अमरेजवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या.









