मनपा कारभाराचा घेतला लेखाजोखा : सायंकाळी 6 पर्यंत अधिकारी माहिती तयार करण्यात गुंतले
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील शुक्रवारी सकाळी अचानक महापालिका कार्यालयात दाखल झाले. बैठक घेऊन विविध माहिती विचारली असता समर्पक माहिती देता आली नाहीत. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱयांची तारांबळ उडाली. सर्व माहिती तयार ठेवा सायंकाळी पुन्हा बैठक घेऊ, अशी सूचना केल्याने सायंकाळी 6 पर्यंत मनपाचे अधिकारी सर्व माहिती तयार करण्यात गुंतले होते.
एरव्ही महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या अधिकाऱयांना पूर्वसूचना देण्यात येते. त्यामुळे सर्व माहिती व कामाचा आढावा तयार केला जातो. मात्र महापालिका प्रशासक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अचानक भेट दिल्यानंतर अधिकाऱयांची धावपळ सुरू झाली. प्रत्येक विभागप्रमुखांना बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली. महापौर कक्षात झालेल्या बैठकीवेळी शहर व उपनगरातील विकासकामांचा आढावा घेतला. विकासकामे अर्धवट असल्याने त्याची पूर्तता का केली नाही, याचा जाब विचारला. त्याचप्रमाणे महसूल वसुली, नगरयोजना विभागाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.
आरोग्य विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत विविध माहिती मनपाच्या अधिकाऱयांकडे विचारली असता व्यवस्थित माहिती देता आली नाही. अधिकाऱयांनी कोणतीच तयारी केली नसल्याने विचारलेली माहिती देण्यास विलंब केला. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी धारेवर धरले. शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पथदीप बंद असल्याने अंधार पसरलेला आहे. अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या समस्या व विविध अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मनपा कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱयांच्या कामाचा आढावा घेतला.
सायंकाळी उशिरापर्यंत आलेच नाहीत…
तसेच रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करावे, अशी सूचना केली. विचारलेली माहिती अधिकाऱयांनी सादर केली नाही. त्यामुळे सायंकाळी पुन्हा बैठक घेणार असल्याचे सांगून दुपारी 2.30 वा. बैठक आटोपती घेतली. त्यामुळे दुपारनंतर सर्व तयारी करण्यात मनपा अधिकारी गुंतले होते. जिल्हाधिकारी 5 वाजता बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले. पण सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी मनपा कार्यालयाकडे आले नाहीत.









