झाडे कोसळून नुकसान : अनेक ठिकाणी विजेचे खांब मोडकळीस : दुरुस्तीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रयत्न
बेळगाव : सोमवारी रात्री झालेल्या वळीव पावसामुळे हेस्कॉमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. पहिल्याच वळिवाने हेस्कॉमची तारांबळ उडविली. शहरासह ग्रामीण भाग रात्रभर अंधारात होता. दुसरे दिवशी पाहणी केली असता अनेक खांब कलंडले होते. त्यामुळे पहिलाच पाऊस हेस्कॉमला त्रासाचा ठरला आहे. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचीही झोप उडविली होती. दुसऱ्या दिवशी दिवसभर दुऊस्तीकाम करुन विद्युत पुरवठा सुरळीत केला. शिवारांमधील वीज खांब अतिशय धोकादायक बनले आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब पूर्णपणे झुकले आहेत. त्यामुळे शिवारात काम करण्यास शेतकरी घाबरत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून ते दुरुस्त करणे व त्यांची देखरेख करणे हे काम हेस्कॉमने केले होते. मात्र सोमवारी पडलेल्या पावसामुळे हेस्कॉम अधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. अचानक आलेल्या पावसामुळे हेस्कॉमला चांगलाच फटका बसला असून अनेक विद्युत खांब कलंडले आहेत. बेळगाव परिसरातील शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी पंपसेट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक शिवारांमध्ये वीज खांबांचे जाळे दिसून येते. अशातच अनेक वीज खांबे पूर्णपणे एका बाजूला झुकले आहेत. त्यामुळे वीज खांब पडून अपघात होण्याचे प्रकारही अनेकदा पहावयास मिळत आहेत. वीज खांब बसविताना योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे जोराचा पाऊस किंवा वादळ आल्यास वीज खांबे एकाबाजूने झुकतात. अशामुळे वीज तारा पूर्ण एकाबाजूला झुकल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना साधा हात जरी वर केला तरी वीज तारेला तो स्पर्श होवू शकेल. इतक्या जवळ विद्युत तारा आल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी शिवारात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत यासाठी यापूर्वीच प्रयत्न करण्याची गरज होती.
धोकादायक ट्रॉन्स्फॉर्मर
गेल्या वर्षी वीज खांबे कोसळण्याचे प्रकार घडले होते. पण हेस्कॉमने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. वीज खांबांच्या धोक्यांमुळे अनेक ठिकाणी असलेले ट्रॉन्स्फॉर्मरही धोकादायक स्थितीत होते. तसे ट्रॉन्स्फॉर्मरही हटविण्यात आले आहेत. पण अजूनही काही धोकादायक ट्रॉन्स्फॉर्मर आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा तालुका हेस्कॉम कार्यालयाला कळविले आहे. पण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांनी अनेकदा फोटो काढून वीज खांबे धोकादायक बन असल्याची माहिती दिली होती. पण नेहमीप्रमाणेच हेस्कॉमने दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळत होत्या. मात्र आता या समस्या सोडविण्यात आल्या असल्या तरी हेस्कॉमला मात्र वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसत आहे.
शिवारांमध्ये दुबारपिके घेतली जातात. अनेकजणांनी जोंधळ्यांची पिके घेतली आहेत. मात्र वीज तारा धोकादायक बनल्यामुळे अनेक शेतकरी शेताकडे गेले तरी वीज खांबांपासून दूरच राहत आहेत. सध्या अनेक शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करतात. पण वीज तारा लोंबकळत असल्यामुळे ट्रॅक्टरचा वापर करणेही मुश्किल झाले आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. हेस्कॉम कर्मचाऱ्यांना शेतात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असा इशाराच आता शेतकऱ्यांनी दिला होता. त्यामुळे हेस्कॉमने आता बऱ्यापैकी दुरुस्ती केली असली तरी नैसर्गिक आपत्तीसमोर हेस्कॉमनेही हात टेकले आहेत. अनेकवेळा वीज खांब व वीज तारांबाबत शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच वादावादी झाली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धऊन किती दिवसांत काम पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावेळी आपण आराखडा बनवित आहे, लवकरच याबाबत निर्णय घेवून मोडकळीस आलेले वीज खांब बदलण्यात येतील, असे आश्वासन देण्यात येते. दरम्यान ही आश्वासने आता बऱ्यापैकी पूर्ण झाली असली तरी वादळी वारा व पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या सोमवारी पडलेल्या पावसामुळे हेस्कॉमला मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
हेस्कॉम कर्मचाऱ्यांची तत्परता
सोमवारी रात्री 11 नंतर सर्वच हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले होते. मंगळवारी दिवसभर दुरुस्तीचे कामे करण्यावर भर दिला होता. विद्युत तारांवर अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तर विद्युत खांबही कलंडले होते. त्यामुळे ते खांब उभे करण्यासाठी दिवसभर भर उन्हामध्ये हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना काम करावे लागले. सकाळपासूनच काम करत होते. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना वारंवार विद्युत पुरवठा खंडित असल्याचे फोन देखील येत होते. बरेच खांब कलंडल्यामुळे विजपुरवठा खंडित झाला होता.









