वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या आशियाई कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे युवा बॅडमिंटनपटू तारा शहा आणि रक्षिता श्री यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या तारा शहाने जपानच्या मिकू कोहराचा 21-6, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. तारा शहाच पुढील सामना चीनच्या झु जिंगशी होणार आहे. दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या रक्षिता श्रीने मलेशियाच्या कॅरीनी टी हिचा 24 मिनिटांच्या कालावधीत 21-8, 21-10 अशा गेस्ममध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. रक्षिताचा पुढील फेरीतील सामना चीनच्या हुआंग रेनशी होणार आहे. मुलींच्या दुहेरीत भारताच्या तनीषा आणि कर्णिका यांनी जपानच्या बुई आणि ट्रेन यांचा 27 मिनिटांमध्ये 21-14, 21-19 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. मुलांच्या एकेरीत भारताच्या आयुश शेट्टीला जपानच्या नेकागेवाकडून तसेच मिश्र दुहेरीत भारताच्या समरवीर आणि राधिका शर्मा यांना चनच्या झुआन आणि तियान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मुलांच्या दुहेरीत भारताच्या दिव्यम आणि मयांक यांनाही हार पत्करावी लागली आहे.









