पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती : त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
वार्ताहर/जांबोटी
ओलमणी ता. खानापूर येथील सार्वजनिक नळपाणीपुरवठा गेल्या पंधरा दिवसापासून पूर्णपणे ठप्प झाला असून ऐन पावसाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळपाणीपुरवठा त्वरित सुरळीत करून नागरिकांची पाण्याअभावी होणारे हाल दूर करावेत, अशी मागणी होत आहे. जांबोटी ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील ओलमणी गावची लोकसंख्या सुमारे 2500 च्या घरात आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी जलनिर्मल योजनेअंतर्गत घरोघरी नळपाणी योजना कार्यान्वित केली आहे. दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मलप्रभा नदीतून जलवाहिन्यांद्वारे गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. उन्हाळ्यात गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र पावसाळ्dयात जून ते सप्टेंबरमध्ये महापूर व गढूळ पाण्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. नळपाणी योजनेला जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित केली नसल्यामुळे पावसाळ्dयात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
खासगी कूपनलिकेवर अवलंबून
गावात दोन सार्वजनिक विहिरी आहेत. मात्र दोन्ही विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे खासगी कूपनलिकांवर अवलंबून राहावे लागते. नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून महादेव पवार यांच्या शेतवडीतील खासगी कूपनलिकेचे पाणी, सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेला जोडल्यामुळे पावसाळ्dयात आठवड्यातील एक-दोन दिवस नागरिकांना पिण्यापुरता पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र पंधरा दिवसापूर्वी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे नळपाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
तांत्रिक बिघाड दूर करण्यात हेस्कॉम कर्मचारी वर्गाला अपयश
तांत्रिक बिघाडामुळे 15 दिवस झाले तरी वीजपुरवठा सुरळीत करण्यास हेस्कॉमच्या कर्मचारी वर्गाला अद्याप यश येत नसल्यामुळे ओलमणी गावचा नळपाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी तांत्रिक समस्या दूर करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.









