वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)
येथे सुरु असलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील वयोगटातील कनिष्ठांच्या पुरूष आणि महिलांच्या आशियाई चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि बोर्निल आकाश चेंगमाई यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली.
मुलांच्या 15 वर्षाखालील वयोगटातील एकेरीच्या उपांत्य सामन्यात शनिवारी बोर्निलने आपल्याच देशाच्या जगशेरसिंग खंगुराचा 21-16, 21-12 अशा सरळ गेम्स्मध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. भारताच्या जगशेरसिंग खंगुराला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुलींच्या 17 वर्षाखालील वयोगटातील एकेरीच्या उपांत्य सामन्यात तन्वी शर्माने थायलंडच्या अनयापत पी. हिचा 21-19, 16-21, 21-11 अशा गेम्स्मध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यामध्ये तन्वीला दुसरा गेम गमवावा लागला होता. 17 वर्षाखालील वयोगटात मुलींच्या विभागात एकेरीची अंतिम फेरी गाठणारी तन्वी शर्मा ही भारताची दुसरी बॅडमिंटनपटू आहे. यापूर्वी उनाती हुडाने असा पराक्रम केला होता. या स्पर्धेत बोर्निलला सुवर्णपदक मिळविण्याची संधी आहे. यापूर्वी म्हणजे 2013 साली भारताच्या सिरील वर्माने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. रविवारी तन्वी शर्माचा अंतिम सामना थायलंडच्या केटकिलिंगशी तर बोर्निलचा अंतिम सामना चीनच्या फेन झुआनशी खेळविला जाणार आहे.









