वडूज :
माण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणी वडूज पोलिसांनी नवी दिल्ली येथे एका ज्योतिष मांत्रिकास ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा शहर पोलीस स्टेशन येथे खंडणी संदर्भात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली होती. तर खटाव माण तालुक्यातील अनेक नेत्यांची चौकशी करण्यात आली आहे. या खंडणी गुह्यातील मुख्य आरोपी चारुशीला मोहिते हिचा मार्गदर्शक असलेल्या ज्योतिष मांत्रिक अशोक छोटूलाल शर्मा (वय 62 रा. कृष्णकुंज, लक्ष्मी नगर नवी दिल्ली-पूर्व) यास वडूज पोलिसांनी शुक्रवारी दि. 20 जून रोजी सकाळी 11:30 वाजता दिल्ली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर कडकधूमा नवी दिल्ली यांचे कोर्टात हजर केले असता त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून 3 दिवसाचे ट्रांजिट रिमांड (स्थलांतर अधिकारपत्र) मंजूर केले आहे. तरी त्यास वडूज पोलीस घेऊन येऊन खंडणीच्या गुह्यात अटक करणार आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे, विजय खाडे, मकसूद सिकंदर यांनी सहभाग घेतला. तर दिल्ली पोलीस दलातील राजकुमार भारद्वाज यांनी सहकार्य केले.








