वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबादचा सलामीवीर तन्मय अग्रवालने अरुणाचल प्रदेशविऊद्धच्या रणजी लढतीत आपले पहिले आणि सर्वांत वेगवान त्रिशतक झळकावून इतिहास रचला आहे. शुक्रवारी हे त्रिशतक त्याने नोंदविले आणि शनिवारी त्यात भर घालत तो बाद झाला तेव्हा त्याच्या नावावर 366 धावा जमा झाल्या होत्या. त्याच्या जोरावर हैदराबादने सिकंदराबादच्या क्रिकेट मैदानावर दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर उभारला. त्यांनी शनिवारी आपला पहिला डाव 4 बाद 615 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर अरुणाचलला लगेच गुंडाळत 1 डाव व 187 धावांने विजय मिळविला.
28 वर्षीय तन्यमने 181 चेंडूंत 34 चौकार आणि 21 षटकारांसह 366 धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो 160 चेंडूंत 323 धावा काढून नाबाद होता. हा सलामीवीर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान त्रिशतक झळकावणारा क्रिकेटपटू बनला आहे. केवळ 28 चेंडूंमध्ये तो 200 वरून 300 पर्यंत पोहोचला आणि 147 चेंडूंत त्रिशतक झळकावत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या मार्को मोराईसने 191 चेंडूंत झळकावलेल्या वेगवान त्रिशतकाचा विश्वविक्रम मोडला.
तन्मयचा सलामीचा जोडीदार राहुल सिंग गहलोत 105 चेंडूंत 185 धावा काढून बाद झाला. या जोडीने सलामीची मोठी भागीदारी करताना 449 धावांपर्यंत मजल मारली, जी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील भारतीय जोडीची पाचवी सर्वोत्तम आहे. त्यापूर्वी अऊणाचल प्रदेशचा पहिला डाव 39.4 षटकात 172 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्या टेकी डोरियाने 127 चेंडूंत नाबाद 97 धावा केल्या. एकूणच शुक्रवारी पहिल्या दिवशी 87.4 षटकांत एकूण 701 धावा नोंदवल्या गेल्या, जे केवळ दुसऱ्यांदाच घडले आहे. दुसऱ्या डावात अरुणाचलला 256 धावाच काढता आल्या.









