राष्ट्रीय युथ टेबल टेनिस स्पर्धा : बंगालच्या सातुर्था बॅनर्जीचा केला पराभव
बेळगाव : केरळ येथील अलेपी येथे 84 व्या सबज्युनियर कॅडेट राष्ट्रीय युथ टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगावची राष्ट्रीय अग्रमानांकित अव्वल खेळाडू तनिष्का कपिल काळभैरव हिने राष्ट्रीय दुसऱ्या मानांकित सातुर्था बॅनर्जी बंगाल हिचा 3-1 अशा गुण फरकाने पराभव करून सुवर्णपदक पटकावित बेळगावचे नाव दुसऱ्यांदा राष्ट्रीयस्तरावर झळकविले आहे. केरळ येथील अलेपी येथे घेण्यात आलेल्या 84 वी सबज्युनियर आणि कॅडट राष्ट्रीय युथ टेबल टेनिस स्पर्धेत 11 वर्षाखाली युथ गटात उपउपांत्यपूर्व फेरीत तनिष्का काळभैरवने तेलंगणाच्या महिमा हिचा 11-6, 11-5, 11-9 अशा गुण फरकाने पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.nउपउपांत्य फेरीत तनिष्काने पश्चिम बंगालच्या मोपीया दास हिचा 11-7, 11-7, 11-5 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तनिष्काने पश्चिम बंगालच्या शाहिद शरिका हिचा 13-11, 11-7, 7-11, 11-5 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत राष्ट्रीय दुसऱ्या मानांकित बंगालच्या सातुर्था बॅनर्जी हिचा तनिष्काने 4-11, 9-11, 6-11, 11-1, 3-1 असा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
सलग दोन सुवर्णपदके पटकावणारी कर्नाटकाची पहिली खेळाडू
सलग दोन सुवर्णपदके पटकावणारी तनिष्का ही कर्नाटकाची पहिली टेबल टेनिसपटू आहे. तनिष्का काळभैरव ही 11 व 13 वर्षाखालील युथ गटात भारताचे अग्रमानांकित यादीत अव्वल स्थानावर कायम राहिली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिला बेळगाव संगम बैलूर्स टेबिल टेनिस अकादमीचे प्रशिक्षक संगम बैलूर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर वडील कपिल काळभैरव, आई सोनाली यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









