वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या झालेल्या सायपन आंतरराष्ट्रीय 2025 च्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 21 वर्षीय नवोदित महिला बॅडमिंटनपटू तानिया हेमंतने एकेरीचे जेतेपद पटकाविताना जपानच्या कानाए साकायचा पराभव केला.
नॉर्दर्न मारियाना आयलँड्स येथे झालेल्या या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 86 व्या मानांकित तानियाने जपानच्या कानाए साकायचा 15-10, 15-8 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. तानियाचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील हे चौथे विजेतेपद आहे. गेल्या वर्षी अझरबैजान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तिने महिला एकेरीचे उपविजेतेपद मिळविले होते.









