कुटुंब जगण्यासाठी एखादा व्यवसाय करावाच लागतो. पण कुटुंब जगवायचं आणि घोड्यालाही जगवायचं म्हणून कोल्हापुरातल्या चौघांनी टांगा व्यवसाय कसाबसा चालू ठेवला आहे. रिक्षा, बस, खासगी वाहने अशा प्रवासी साधनांच्या गर्दीत टांगा कालबाह्य झाला आहे. कोल्हापुरातल्या या चौघांनी टांगा आणि त्या निमित्ताने घोडाही जिवंत ठेवला आहे. एक काळ कोल्हापुरात 150 टांगे होते. खास टांग्यासाठी दहा स्टॉप होते. पण आता एसटी स्टँडवर दोन व लक्ष्मीपुरीत दोन थांबलेले टांगे त्यांचे अखेरचे अस्तित्व दाखवत आहेत.
टांग्यातून फिरणे हे एक काळ प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात होते. दारात टॉक-टॉक करत टांगा थांबला की पाहुण्यांचे आगमन हे ओळखण्याचा रिवाज होता अर्थात त्या काही रिक्षा नव्हत्या आणि ज्या होत्या त्याचे भाडे सर्वसामान्यांना परवडत नव्हते. त्यामुळे एका टांग्यातून ‘चल मेरे घोडे’ म्हणत चौघांचा प्रवास ठरलेला होता. कोल्हापुरात 150 टांगे होते, त्यांचे भवानी मंडप कमान,लक्ष्मीपुरी, शिवाजी पुतळा, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँड, मिरजकर तिकटी अशा महत्त्वाच्या ठिकाणी थांबे होते. त्या ठिकाणी घोड्यांना पाणी पिण्यासाठी नगरपालिकेने हौदही बांधून दिले होते. दरवर्षी डीवायएसपी ऑफिससमोरच्या प्रांगणात पोलिसांकडून टांग्याचे पासिंग केले जात होते. टांग्यांना नंबरही दिले गेले होते.
हळूहळू प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षाचे कोल्हापूर शहरात आगमन झाले. आता साहजिकच टांगा व्यवसायिक बेरोजगार होणार म्हणून नवीन रिक्षाचे परमिट कोल्हापुरात टांगा चालकांनाच प्राधान्याने दिले गेले. बहुतेक टांगेवाल्यांच्या हातात घोड्याच्या लगाम ऐवजी रिक्षाचे स्टेअरिंग आले. काळाच्या ओघात टांग्यातून प्रवास करणे थोडे हलके मानले जाऊ लागले. तरीही या परिस्थितीत सहा लाख लोकसंख्येच्या व दोन लाखांहून अधिक वाहने असलेल्या कोल्हापुरात चार टांग्यांनी आपले पुसटसे का होईना, पण अस्तित्व टिकवून धरले आहे. चार प्रवाशांची एसटी स्टँड ते अंबाबाई मंदिर वाहतूक ते करत आहेत. कशाबशा तीन फेऱ्या होतील एवढेच प्रवासी ते ही बाहेर गावचे मिळत आहेत. त्यात टांगेवाला पहिली घोड्याची गुजरान व उरलेल्या पैशात कुटुंबाची गुजरान करत आहेत. घोडा जगवायचा म्हणून घोडा आहे तोवर हा व्यवसाय करायचा, ही त्यांची त्या मागची एक निखळ अशी भावना आहे.
रोज 150 रुपयांचा चारा, चंदी….
टांगा चालू असू दे, बंद असू दे, घोड्यासाठी 150 रूपये बाजूला काढून ठेवावेच लागतात. त्याचे पोट भरले त्याच्यात ताकद टिकली तरच तो प्रवाशांची वाहतूक करणार. त्यामुळे त्याला जगवण्यासाठी व त्याच्या जीवावर कुटुंबाला जगवण्यासाठी आमची वाटचाल चालू आहे. अहमद खाटिक, टांगाचालक









