भूमिगत ब्रिज बांधण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
बेळगाव : तानाजी गल्ली येथील रेल्वेगेट नैऋत्य रेल्वेने कायमस्वरुपी बंद केले. यामुळे ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली, फोर्ट रोड, महाद्वार रोड येथील नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. कोणत्याही कामाकरिता त्यांना एकतर जुना धारवाड रोड येथील उड्डाण पूल किंवा कपिलेश्वर उड्डाण पुलाचा वापर करावा लागत आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थी व वयोवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. नैऋत्य रेल्वेने 10 मार्चपासून तानाजी गल्ली येथील रेल्वेगेट बंद केले. विद्युतीकरणामुळे रेल्वेची गती वाढली असून, कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी शहरातील रेल्वेगेट टप्प्याटप्प्याने बंद केले जात आहेत. तानाजी गल्ली रेल्वेगेटवर उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव होता. परंतु कपिलेश्वर उड्डाण पूल बांधल्यानंतर भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली येथील परिसराची काय अवस्था झाली याचा अनुभव पाठीशी असल्याने स्थानिकांनी उड्डाण पुलाला विरोध केला. यामुळे रेल्वेने या ठिकाणचा उड्डाण पूल रद्द करत रेल्वेगेट कायमस्वरुपी बंदचा निर्णय घेतला.
वळसा घालून जाणे अवघड
शहराच्या मध्यवर्ती भागातील रेल्वेगेट बंद झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. जवळपास पर्यायी मार्गही उपलब्ध नसल्याने 10 ते 15 मिनिटांचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी पुढे संभावणाऱ्या समस्यांची जाणीव झाली नव्हती. परंतु सध्या गेट बंद झाल्याने स्थानिक रहिवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
खासदारांची घेणार भेट
रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद झाल्याने नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांची स्थानिक नागरिक भेट घेणार आहेत. उड्डाण पूल नको, परंतु नागरिक व दुचाकीस्वारांना ये-जा करण्यासाठी छोटा भूमिगत ब्रिज करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी खासदार व रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेण्याची तयारी स्थानिक नागरिकांनी दाखविली आहे.









