प्रकल्पातून मिळणार 1200 मेगा वॅट वीज : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
पणजी : तमनार वीज प्रकल्प रद्द करण्याची मागणी विरोधी आमदारांनी विधानसभेत केल्यानंतर त्याचा फायदा होणार असल्याचा दावा करीत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्या प्रकल्पातून 1200 मेगा वॅट वीज मिळणार असल्याची माहिती दिली. सदर प्रकल्पासाठी सुमारे 17000 झाडे कापावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालयाच्या आदेशानुसार म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र झाल्यास तमनार प्रकल्पासाठी अडचणी येणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. ढवळीकर यांनी प्रथम विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पास विरोध दर्शवला होता. तृणमूल काँग्रेसशी मगोपने युती कऊन जाहीरनाम्यातही हा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन ढवळीकर यांनी दिले होते. आता मंत्रिपद मिळताच थापेबाजी कऊन हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न ते करीत असल्याबद्दल सरदेसाई यांनी जोरदार टीका केली. त्यास मात्र ढवळीकरांनी कोणतेही उत्तर दिले नाही. हा प्रकल्प गोव्यासाठी फायदेशीर असल्याचे ते सांगत राहिले. ढवळीकर पुढे म्हणाले की, या प्रकल्पातून गोवा ते कर्नाटक दरम्यान 240 किमी वीजवाहिनी घालण्याचा प्रस्ताव आहे. म्हापसा ते धारबांदोडा वीजवाहिनी डिसेंबर 2023 पर्यंत तर धारबांदोडा ते कर्नाटकपर्यंतच्या वीजवाहिनीचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. धारबांदोडा वीज उपकेंद्रासाठी 400 कोटी ऊपये खर्च येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक प्रकल्प पूर्ण करण्याची हमी नाही
कर्नाटकच्या जंगल भागातून हा तमनार प्रकल्प पूर्णत्वास जाणार की नाही याची कोणतीही हमी सध्या कोणच देत नाही. मग हा प्रकल्प झाडे कापून पुढे नेण्याचा प्रयत्न कोणाच्या भल्यासाठी? अशी विचारणा विजय सरदेसाई यांनी केली. कर्नाटकात हा प्रकल्प होणार की नाही ते प्रथम ठरवण्याची गरज आहे. तो ठरलेला नसताना गोव्यातील प्रकल्प पूर्ण कऊन काय साधणार? असा प्रश्नही सरदेसाईंनी उपस्थित केला. हे प्रकल्पाचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असून त्यावर गोव्याचे कोणतेही नियंत्रण नाही. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या केंद्रीय उच्चाधिकार समितीच्या शिफारशीप्रमाणे काम सुरू असल्याचे ढवळीकर यांनी पुढे सांगितले.
या प्रकल्पासाठीचे काम फुकट जाणार नाही
या प्रकल्पासाठी केलेले काम, साधन-सुविधा फुकट जाणार नाहीत तर त्यांचा गोव्यातील वीज सुधारणेसाठी मोठा उपयोग होऊ शकतो असा दावा ढवळीकर यांनी केला. सदर प्रकल्पाचे कर्नाटकमधील काम झाले नाही किंवा ते अपयशी ठरले तर कोल्हापूरमधून वीज आणण्याची तयारी ठेवल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली. या प्रकल्पासाठी 103 टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले असून कर्नाटकातील आंबेवाडी येथून हा प्रकल्प सुरू होतो. तेथून विविध ठिकाणी वीजवाहिन्या जोडल्या जाणार आहेत, असेही ढवळीकर म्हणाले. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी कर्नाटकमध्ये या प्रकल्पाचे काम झाले नाही तर गोव्यातील काम वाया जाणार असल्याने तो रद्दच करावा, अशी मागणी त्यांनी केली.









