पंतप्रधान शेख हसिना यांच्या भेटीनंतर निवृत्तीचा निर्णय घेतला मागे : लिटन दास बांगलादेशचा नवा कर्णधार
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश वनडे संघाचा कर्णधार तमिम इक्बाल याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, आता तमिमने 24 तासांच्या आत आपल्या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतल्यानंतर तमिमने निवृत्ती मागे घेतली आहे. यामुळे हा दिग्गज खेळाडू श्रीलंका-पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत आणि भारतात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
तमिमने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयानंतर शेख हसीना यांनी तमिमला घरी भेटीचे निमंत्रण दिले होते. या भेटीत इक्बाल आणि शेख हसीना यांच्यात चर्चा झाली. यानंतर तमिमने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी पंतप्रधानांनी मला घरी बोलावलं. त्यांनी मला कानउघडणी केली. त्यानंतर मला पुन्हा क्रिकेट खेळायला सांगितलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे, असे तमीमने म्हटले आहे. या भेटीप्रसंगी तमिमसह माजी कर्णधार मश्रफी मुर्तजा, बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजमूल हसन उपस्थित होते. दरम्यान, विशेष म्हणजे, तमिमने निवृत्ती घेतल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लिटन दास याच्याकडे वनडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. मात्र, आता निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर तमिम पुन्हा बांगलादेशचा कर्णधार बनतो की, नाही हे येणारा काळच सांगेल.
बांगलादेशची धुरा लिटन दासकडे
नियमित वनडे कर्णधार तमिम इक्बालने गुरुवारी तडकाफडकी निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला. अफगाणविरुद्ध वनडे मालिका सुरु असताना तमिमने हा निर्णय घेतल्याने संघाची चांगलीच अडचण झाली होती. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने तत्काल शुक्रवारी लिटन दासची नियुक्ती कर्णधारपदी केली आहे. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पुढचे दोन्ही सामने लिटन दास याच्या नेतृत्वात खेळले जातील. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला होता. आता, या मालिकेतील दुसरा व तिसरा सामना 8 व 11 जुलै रोजी खेळवला जाणार आहे.









