प्रो कबड्डी लीग : 32-25 गुणांनी मात, नरेंदर, साहिल गुलियाचे चमकदार प्रदर्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळ थलैवाजने यूपी योद्धाजचा 32-25 अशा गुणांनी पराभव करून प्रो कबड्डी लीगमधील प्लेऑफ फेरीत स्थान मिळविण्याच्या आशा वाढवल्या आहेत.
थलैवाजचा स्टार रायडर नरेंदरने सुपर 10 गुण नोंदवले तर कर्णधार व स्टार डिफेंडर साहिल गुलियाने हाय फाईव्ह मिळविले. या विजयानंतर थलैवाज संघ गुणतक्त्यात आठव्या क्रमांकावर पोहोचला असून सहाव्या स्थानापर्यंतच्या संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळते.
यूपी योद्धाजला गगन गौडा व महीपाल यांनी सात रेडपॉईंट्स मिळवित आघाडीवर नेले. थलैवाजसाठी नरेंदर हा त्यांचा प्रमुख रायडर होता. मात्र त्याला इतर संघसहकाऱ्यांकडून पुरेशी साथ मिळाली नाही. योद्धाज निर्णायक आघाडी मिळविणार असे वाटत असतानाच थलैवाजचे रायडर्स जोर वाढवत होते. नरेंदर हा मुख्य धोका होता तर साहिल गुलियाने डाव्या कॉर्नरमध्ये चांगली कामगिरी करीत हाय फाईव्ह मिळविले. मध्यंतराला थलैवाजने 21-16 अशी आघाडी मिळविली होती.
उत्तरार्धात योद्धाजने सलग दोन गुण मिळविताना तामिळ थलैवाजला सुपर टॅकल स्थितीत आणले. मात्र हिमांशूने करो या मरो रेड टाकत आवश्यक गुण मिळवित बरोबरी साधून दिली. यामुळे थलैवाजचा जोश वाढला आणि त्यांनी लागोपाठ दोन गुण मिळविले. आघाडी गमविल्यानंतर योद्धाजने थलैवाजला गाठण्यासाठी खूप प्रयत्न केले. अनिल कुमार व महीपाल यांनी यशस्वी रेड टाकल्या. मात्र त्यांच्या डिफेंडर्सना थलैवाजच्या रायडर्सना गुण मिळवण्यापासून रोखण्यात अपयश आले. नरेंदरने आपला फॉर्म कायम राखत या मोसमातील नववे सुपर 10 मिळविले आणि थलैवाजला मोठी आघाडी मिळवून देत विजयही साकार केला.









