वृत्तसंस्था/ बेंगळूर/पुणे
येथील कंठीरव्वा स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील सामन्यात तामिळ थलैवासने जयपूर पिंक पँथर्सचा 38-27 अशा गोलफरकाने पराभव केला. नवे प्रमुख प्रशिक्षक आशेनकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तामिळ थलैवासचा हा पहिला विजय आहे. प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील दुसरा टप्पा पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती संकुलात सुरू होणार आहे. दरम्यान युपी योद्धास संघाचा दुसऱया टप्प्यातील पहिला सामना पाटणा पायरेटस्शी होणार आहे.
शुक्रवारी झालेल्या तामिळ थलैवास आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील सामन्यात तामिळ थलैवास संघातील नरेंदरची कामगिरी दमदार झाली. त्याने या सामन्यात 13 गुण मिळवले. सामन्यातील 6 व्या मिनिटाला तामिळ थलैवासने जयपूर पँथर्सचे सर्व गडी बाद करून 12-1 अशी भक्कम आघाडी घेतली. जयपूर पिंक पँथर्सच्या अजितकुमारने तामिळ थलैवासची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला पण तामिळ संघाच्या बचावफळीतील अभिषेकच्या कामगिरीमुळे तामिळ संघाने पुन्हा आपली आघाडी वाढविली. 14 व्या मिनिटाला तामिळ संघाने जयपूर पँथर्सवर 17-5 अशी 12 गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर नरेंदरच्या आक्रमक चढायामुळे तामिळ संघाने मध्यंतरापर्यंत 20-8 अशी बढत मिळवली होती. नरेंदर आणि सुनीलकुमार यांच्यात सामन्याच्या उत्तरार्धात गुण मिळवण्यासाठी चुरस सुरू झाली. तामिळ थलैवासने जयपूर पिंक पँथर्सचे पुन्हा सर्व गडी बाद करून 28 व्या मिनिटाअखेर 16 गुणांची आघाडी घेतली. शेवटी तामिळ थलैवासने हा सामना 11 गुणांच्या फरकाने जिंकला.
पुण्यातील बालेवाडीच्या शिव छत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धेच्या दुसऱया टप्प्याला प्रारंभ होणार आहे. युपी योद्धासचा सामना पाटणा पायरेट्स बरोबर खेळवला जाणार आहे. युपी योद्धास संघाने पहिल्या टप्प्यातील शेवटच्या सामन्यात तामिळ थलैवासचा 41-24 असा पराभव केला होता. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात युपी योद्धास संघ 18 गुणासह नवव्या स्थानावर असून पाटणा पायरेटस् 7 सामन्यातून 13 गुणासह 10 स्थानावर आहे. युपी योद्धास आणि पाटणा पायरेट यांच्या आतापर्यंत 11 वेळा सामने झाले असून त्यापैकी 4 सामने युपी योद्धासने जिंकले आहेत.









