वृत्तसंस्था / चेन्नई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने नेहमीच तामिळनाडूला अर्थसंकल्पीय साहाय्य देताना उदारता दाखविली आहे. राज्याची आवश्यकता लक्षात घेऊन भरीव आर्थिक वाटा देण्यात आला आहे. तरीही या राज्याचे मुख्यमंत्री अर्थसंकल्पावर विनाकारण टीका करीत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री जीतेंद्र सिंग यांनी शनिवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
तामिळनाडू सरकारला अर्थसंकल्पावर टीका करण्याचा आणि अर्थसंकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार नाही. जो निधी आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने या राज्याला दिला, त्याचा पूर्णांशाने उपयोगही या राज्य सरकारने केलेला नाही. असे असूनही या राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे केंद्राकडून अधिक निधीची अनाठायी अपेक्षा करीत आहेत. जो निधी दिलेला आहे, तो आधी त्यांनी योग्यप्रकारे उपयोगात आणावा, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
अनेक प्रकल्पांसाठी निधी
तामिळनाडूच्या अनेक प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तथापि, केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रकल्प मार्गी लागले आहेत. अनेक प्रकल्प निधी तिजोरीत असूनही अत्यंत मंदगतीने क्रियान्वित केले जात आहेत. यातून राज्य सरकारची अकार्यक्षमता सिद्ध होते. राज्य सरकारने आपली क्षमता वाढवावी. पण ते न करता ते केंद्र सरकारच्या विकासाभिमुख अर्थसंकल्पावरच तोंडसुख घेऊन स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. ही प्रवृत्ती योग्य नव्हे, अशी टीकाही जीतेंद्र सिंग यांनी यावेळी केली.









