साई किशोर : 27 धावांत 4 बळी
वृत्तसंस्था/ कोईमत्तूर
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्णधार साई किशोरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर तामिळनाडूने विद्यमान विजेत्या सौराष्ट्रचा एक डाव 33 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला. या सामन्यात साई किशोरने 27 धावात 4 गडी बाद केले.
या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रने पहिल्या डावात 183 धावा जमविल्या. त्यानंतर तामिळनाडूचा पहिला डाव 338 धावात आटोपला. तामिळनाडूने सौराष्ट्रवर पहिल्या डावात 155 धावांची आघाडी मिळविली. सौराष्ट्रचा दुसरा डाव 75.4 षटकात 122 धावात आटोपल्याने तामिळनाडूने हा सामना खेळाच्या एक दिवस बाकी ठेवून डावाने जिंकला. सौराष्ट्रच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने एकाकी लढत देत 46 धावा जमविताना वासवदा समवेत चौथ्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर सौराष्ट्रच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. तामिळनाडूचा कर्णधार साई किशोरने 27 धावात 4 गडी बाद केले. तत्पूर्वी तामिळनाडूच्या पहिल्या डावात बाबा इंद्रजितने 80 धावा झळकविल्या होत्या. तसेच साई किशोरने 60, भूपती कुमारने 65 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र प. डाव 183, तामिळनाडू प. डाव 338 (बाबा इंद्रजित 80, साई किशोर 60, भूपती कुमार 65, चिराग जानी 3-22), सौराष्ट्र दु. डाव 75.4 षटकात सर्वबाद 122 (चेतेश्वर पुजारा 46, वासवदा 20, साई किशोर 4-27).









