वृत्तसंस्था/ कोईमत्तूर
2024 च्या रणजी हंगामातील येथे रविवारी झालेल्या इलाईट क गटातील सामन्यात साईकिशोरच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर तामिळनाडूने चंदीगडचा एक डाव 293 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात तामिळनाडूने बोनस गुणही वसुल केला. रेल्वेने गुजरातचा 184 धावांनी तर पंजाबने गोव्याचा 6 गड्यांनी पराभव केला.
या सामन्यात चंदीगडचा पहिला डाव 111 धावांत आटोपल्यानंतर तामिळनाडूने आपला पहिला डाव 4 बाद 610 धावांवर घोषित केला. नारायण जगदिशनने त्रिशतक (321), प्रदोष रंजन पॉलने 105, बाबा इंद्रजीतने 123 धाव जमविल्या. तामिळनाडूने चंदीगडवर पहिल्या डावात 499 धावांची भक्कम आघाडी मिळविली होती. त्यानंतर चंदीगडचा दुसरा डाव 206 धावांत आटोपला. तामिळनाडूच्या साईकिशोरने 80 धावात 5 गडी बाद केले. या सामन्यात तामिळनाडूला 6 गुण मिळाले असून आता ते क गटात 15 गुणासह पहिल्या स्थानावर आहेत. तामिळनाडूने यापूर्वीच्या सामन्यात रेल्वेचा एक डाव आणि 129 धावांनी पराभव केला होता. तामिळनाडूच्या जगदिशनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
रेल्वे विजयी
बलसाड येथे झालेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात रेल्वेने गुजरातचा 184 धावांनी पराभव केला. या सामन्यात रेल्वेने पहिल्या डावात 313 धावा जमविल्यानंतर गुजरातचा पहिला डाव 198 धावात आटोपला. रेल्वेने दुसऱ्या डावात 228 धावा जमवित गुजरातला निर्णायक विजयासाठी 344 धावांचे आव्हान दिले. गुजरातचा दुसरा डाव 159 धावात आटोपला. रेल्वेच्या कर्ण शर्माने 20 धावात 4 गडी बाद केले.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात पंजाबने गोव्याचा 6 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात गोव्याचा पहिला डाव 104 धावा जमविल्यानंतर पंजाबने पहिल्या डावात 190 धावा करत 86 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर गोव्याचा दुसरा डाव 179 धावात आटोपला. पंजाबला विजयासाठी 93 धावांची गरज होती. पंजाबने दुसऱ्या डावात 18.3 षटकात 4 बाद 96 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला.
अगरताला येथील सुरू असलेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात कर्नाटकचा संघ विजयाच्या मार्गावर आहे. या सामन्यात कर्नाटकाचा पहिला डाव 241 धावात आटोपल्यानंतर त्रिपुराचा पहिला डाव 200 धावा संपुष्टात आल्याने कर्नाटकाने 41 धावांची आघाडी घेतली. मात्र कर्नाटकाची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली. त्यांचा दुसरा डाव 151 धावात आटोपल्याने त्रिपुराला निर्णायक विजयासाठी 192 धावांचे उद्दिष्ट मिळाले. दिवस अखेर त्रिपुराने दुसऱ्या डावात 24 षटकात 3 बाद 59 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक – चंदीगड प. डाव 111, दु. डाव सर्व बाद 206, तामिळनाडू प. डाव 4 बाद 610 डाव घोषित, रेल्वे प. डाव 313, दु. डाव 228, गुजरात प. डाव 198, दु. डाव 159, पंजाब प. डाव 190, दु. डाव 4 बाद 96, गोवा प. डाव 104, दु. डाव 179, कर्नाटक प. डाव 241, दु. डाव सर्व बाद 151, त्रिपुरा प. डाव सर्व बाद 200, दु. डाव 3 बाद 59.









