वृत्तसंस्था / चेन्नई
दुबईत काम करणाऱ्या तामिळनाडूतील एका व्यक्तीचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्याला एक जॅकपॉट लागला असून त्यामुळे त्याला यापुढची 25 वर्षे सातत्याने प्रतिमहिना 5 लाख 60 हजार रुपये घरबसल्या मिळणार आहेत. मगेश कुमार नटराजन असे या व्यक्तीचे नाव आहे. तो एका कंपनीत व्यवस्थापक आहे.
जॅकपॉट ही एक प्रकारची लॉटरी असते. त्याने या लॉटरीचे तिकिट घेतले होते. त्यावेळी याला इतका लाभ होईल अशी अपेक्षाही नव्हती. पण त्याला दैवाने हात दिला आणि मोठा धनलाभ झाला आहे. आता त्याला पुढची 25 वर्षे काहीही काम करण्याचीही आवश्यकता नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या नटराजन याचे वय 49 वर्षांचे असून त्याच्या वृद्धापकाळाची चिंताही आता दूर झाली आहे. हा जॅकपॉट एफएएसटी 5 या नावाने ओळखला जातो. तो हा जॅकपॉट जिंकणारा भारताचा पहिला व्यक्ती आहे. या पैशाचा काही भाग आपण आपल्या समाजासाठी खर्च करणार आहोत, असे नटराजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.









