वृत्तसंस्था/चेन्नई
येथे सुरू असलेल्या हॉकी इंडियाच्या पहिल्या मास्टर्स चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत तामिळनाडू आणि महाराष्ट्र यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूने चंदीगडचा 3-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने ओडिशाचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले. तामिळनाडू आणि चंदीगड यांच्यातील सामन्यात पहिल्याच मिनिटाला तामिळनाडू संघाचे खाते विनोदकुमारने मैदानी गोलवर उघडले. मध्यंतरापर्यंत तामिळनाडूने चंदीगडवर 1-0 अशी आघाडी घेतली होती.
सामन्यातील 40 व्या मिनिटाला एस. सुदर्शनने तामिळनाडूचा दुसरा गोल तर 54 व्या मिनिटाला सिंक्लेअरने तामिळनाडूचा तिसरा गोल केला. या सामन्यात चंदीगडला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. दुसऱ्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने ओडिशाचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले. महाराष्ट्रातर्फे लिनॉर्ड परेराने चौथ्या आणि 17 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. विक्रम पिल्लेने 38 व्या मिनिटाला तसेच कार्ल गोम्सने 43 व्या मिनिटाला गोल नोंदविले. ओडिशातर्फे एकमेव गोल कर्णधार लाझारुस बार्लाने 27 व्या मिनिटाला नोंदविला होता.









