वृत्तसंस्था/ राजकोट
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडू, हरियाणा, कर्नाटक आणि राजस्थान यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बाबा इंद्रजितच्या शानदार शतकाच्या जोरावर तामिळनाडूने मुंबईचा 7 गड्यांनी पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.
या स्पर्धेत तामिळनाडू आणि हरियाणा यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना तर बलाढ्या कर्नाटक आणि राजस्थान यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे. हरियाणा संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बंगालचा 4 गड्यांनी पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले. तसेच कर्नाटकाने विदर्भचा 7 गड्यांनी तर राजस्थानने केरळचा 200 धावांनी दणदणीत फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे.
तामिळनाडू विजयी
तामिळनाडू आणि मुंबई यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव 48.3 षटकात 227 धावात आटोपला. त्यानंतर तामिळनाडूने 43.2 षटकात 3 बाद 229 धावा जमवून विजय नोंदविला. मुंबईच्या डावामध्ये प्रसाद पवारने 59, शिवम दुबेने 45 धावा केल्या. तामिळनाडूतर्फे वरुण चक्रवर्ती आणि साई किशोर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तामिळनाडूच्या डावामध्ये बाबा इंद्रजितने 98 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 103 तर विजय शंकरने 58 चेंडूत नाबाद 51 धावा झळकविल्या. या जोडीने 20 षटकात 126 धावांची भागिदारी केली. विजय शंकरने आपल्या खेळीमध्ये 1 षटकार आणि 8 चौकार ठोकले. बाबा अपराजितने 45 धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक – मुंबई 48.3 षटकात सर्व बाद 227 (प्रसाद पवार 59, शिवम दुबे 45, वरुण चक्रवर्ती आणि साई किशोर प्रत्येकी 3 बळी), तामिळनाडू 43.2 षटकात 3 बाद 229 (बाबा इंद्रजित नाबाद 103, विजय शंकर नाबाद 51, बाबा अपराजित 45).
हरियाणा विजयी
या स्पर्धेतील दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हरियाणाने बंगालचा 4 गड्यांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना बंगालचा डाव 225 धावांवर आटोपला. त्यानंतर हरियाणाने 45.1 षटकात 6 बाद 226 धावा जमवित विजय नोंदविला. बंगालच्या डावामध्ये शहबाद अहमदने 4 षटकार आणि 4 चौकारांसह 100, पी. प्रामाणिकने 21, अभिषेक पोरलने 24 धावा जमविल्या. हरियाणाच्या यजुवेंद्र चहलने 37 धावात 4 तर राहुल तेवातियाने 32 धावात 2 गडी बाद केले. त्यानंतर हरियाणाने 45.1 षटकात 6 बाद 226 धावा केल्या. हरियाणाच्या डावात अंकित कुमारने 102 चेंडूत 102 तर अशोक मिनारियाने 39 धावांचे योगदान दिले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 126 धावांची भागिदारी केली. राहुल तेवातियाने 21 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – बंगाल 50 षटकात सर्व बाद 225 (शहबाज अहमद 100, प्रामाणिक 21, पोरल 24, यजुवेंद्र चहल 4-37, तेवातिया 2-32), हरियाणा 45.1 षटकात 6 बाद 226 (अंकित कुमार 102, अशोक मिनारिया 39, राहुल तेवातिया 21, मोहम्मद कैफ आणि पी. प्रामाणिक प्रत्येकी 2 बळी).
राजस्थानचा मोठा विजय
या स्पर्धेतील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात राजस्थानने केरळचा 200 धावांनी दणदणीत पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले. राजस्थानतर्फे डावखुऱ्या महिपाल लोमरोरने शानदार शतक झळकवले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 50 षटकात 8 बाद 267 धावा जमविल्या. लोमरोरने नाबाद 122 तर कुणालसिंग राठोडने 66 धावांचे योगदान दिले. केरळतर्फे अखिनने 62 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर केरळने 21 षटकात 9 बाद 67 धावा जमविल्या. त्यांचा एक फलंदाज दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही. सचिन बेबीने 28 धावा जमविल्या. राजस्थानच्या अंकित चौधरीने 4 तर अराफत खानने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – राजस्थान 50 षटकात 8 बाद 267 (महिपाल लोमरोर नाबाद 122, कुणालसिंग राठोड 66, अखिन 3-62), केरळ 21 षटकात 9 बाद 67 (सचिन बेबी 28, अंकित चौधरी 4-26, अराफत खान 3-20).
कर्नाटकाचा विजय
या स्पर्धेतील चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकाने विदर्भचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भचा डाव 44.5 षटकात 173 धावात आटोपला. त्यानंतर कर्नाटकाने 40.3 षटकात 3 बाद 177 धावा जमवित आपला विजय नोंदविला. विदर्भच्या डावात शुभम दुबेने 41, अक्षय वाडकरने 32, यश ठाकुरने 38 धावा केल्या. कर्नाटकातर्फे विजय कुमारने 44 धावात 4 गडी बाद केले. त्यानंतर कर्नाटकाने 3 गड्यांच्या मोबदल्यात हा सामना 7 गड्यांनी जिंकला. कर्नाटकातर्फे समर्थने नाबाद 72 तर मयांक अगरवालने 51 धावा जमविल्या. विदर्भच्या दुबेने 32 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – विदर्भ 44.5 षटकात सर्व बाद 173 (शुभम दुबे 41, अक्षय वाडकर 32, यश ठाकुर 38, व्ही. विजयकुमार 4-44), कर्नाटक 40.3 षटकात 3 बाद 177 (समर्थ नाबाद 72, अगरवाल 51, हर्ष दुबे 2-32).









