अनेक आस्थापनांचे कर थकीत : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांत संताप
बेळगाव : तालुका पंचायतीचा कारभार ‘असून अडचण नसून खोळंबा’ असाच सुरू आहे. दरम्यान तालुका पंचायतच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आस्थापनांचा अधिकाऱ्यांना विसर पडला आहे. त्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे. अनेक आस्थापनांचे भाडे थकीत असून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी उमटत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अशा आस्थापनांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. बेळगाव तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणारी घरपट्ट, पाणीपट्टी थकीत असते. तसेच ता. पं. च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आस्थापनांचेही भाडे थकीत राहिले आहे. बेळगाव शहर व तालुका परिसरात आस्थापने आहेत. मात्र त्यांची योग्य निगराणी व त्याकडे दुर्लक्ष यामुळे त्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. नेहरुनगर येथील आस्थापनांचे अनेक गाळे रिकामी आहेत. त्यांचा लिलाव करण्याकडे अधिकाऱ्यांकडून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. याचबरोबर तेथील भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या गाळेधारकांकडून भोडेही वेळेवर पोहोचत नाही.
तालुका पंचायत अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष
नेहरुनगर, अनगोळसह इतर भागात ता. पं.कार्यालयांची आस्थापने आहेत. त्याठिकाणी संबंधित अधिकारी पोहोचलेच नाहीत. तत्कालीन कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी याबाबत गांभीर्याने घेतले होते. ज्यांनी भाडे भरले नाहीत तशांना नोटीस पाठवून जागा खाली करण्याचे आदेश दिले होते. नेहरुनगर येथेही अशीच अवस्था झाली होती. त्यामुळे तेथील बेकायदेशीर गाळे धारकांना नोटिसा बजावून ते गाळे खाली केले होते. नेहरुनगर येथील काही गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. याचबरोबर विशेष करून स्वसाहाय्य संघातील महिलांच्या नावे हे गाळे दिले आहेत. परंतु बहुतांश गाळे लिलाव प्रक्रिया राबविली नसल्याने खाली आहेत. ते लिलाव करण्याकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे तालुका पंचायतीचा मिळणारा कर आता बुडीत आहे. याबाबतही गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही.









