ग्राम पंचायतींना पाणी चाचणी कीट वाटप
बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी ग्राम पंचायतींना पाणी चाचणी कीटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात पाण्यातून विविध साथीच्या रोगांची लागण होते. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 57 ग्राम पंचायतींना पाणी चाचणीसाठी कीट देण्यात आले आहे. त्याबरोबर ग्राम पंचायतमधील संबंधित पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यू आणि मलेरिया रोगाने डोके वर काढले होते. शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे प्रशासनाने पिण्याच्या पाण्याबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. सर्व ग्राम पंचायतींना पिण्याच्या पाण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी कीट देण्यात आले आहेत. याबाबत पंधरा दिवसातून एकदा तालुका पंचायतीकडे अहवाल सादर करावा लागणार आहे.
आता प्रशासन अधिक जागृत
ग्रामीण भागात तलाव आणि कूपनलिकेच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो. काही ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा देखील केला जातो. त्यामुळे साथीच्या रोगाच्या आजारांना तोंड द्यावे लागते. यासाठी आता प्रशासन अधिक जागृत झाले असून सर्व ग्राम पंचायतींना पाणीचाचणीचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय याबाबतचा अहवालही द्यावा लागणार आहे.
अहवाल सादर करण्याच्या सूचना
शुक्रवारी तालुका पंचायत कार्यालयात 57 ग्राम पंचायतींच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे पाणीचाचणीचे कीट सुपूर्द करण्यात आले आहेत. शिवाय याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. तसेच पाण्याबाबतचे अहवाल सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.









