100 मीटर इतकी असणार उंची, 2026 पर्यंत पूर्ण होणार निर्मिती कार्य
कुठल्याही इमारतीच्या उभारणीकरता सिमेंट, दगड, वाळू आणि अनेक गोष्टींचा वापर केला जातो. परंतु स्वीत्झर्लंडमध्ये एक अशी इमारत निर्माण केली जात आहे, ज्यात यापैकी कुठल्याच गोष्टीचा वापर केला जाणार नाही. ही इमारत लाकडाद्वारे निर्माण करण्यात येणार आहे.
स्वीत्झर्लंडच्या ज्यूरिकनजीक विंटरथुर शहरात लाकडाचा वापर करून इमारत उभी करण्यात येईल. विंटरथुरमध्ये 100 मीटर (328 फूट) उंचीची इमारत पूर्णपणे लाकडाद्वारे निर्माण करण्यात येईल. लाकडाचा वापर करत इतकी उंच इमारत निर्माण करणे हे अनोखे काम ठरणार आहे.

डॅनिश फर्म श्मिट हॅमर लासेन आर्किटेक्ट्स (एसएचएल)कडून ही इमारत निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नाव रॉकेट अँड टायगरली असल्याचे एसएचएलच्या डिझायनर्सनी सांगितले. ही इमारत पूर्णपणे पर्यावरणस्नेही असणार आहे. इमारतीच्या भिंतीपासून छतापर्यंत सर्वकाही लाकडाद्वारेच तयार करण्यात येईल. 2026 पर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होणार आहे.
सर्व सुविधा उपलब्ध असणार
एसएचएलने स्वीस आर्किटेक्चर स्टुडिओ कॉमेट्री ट्रफर होडलसोबत मिळून इमारतीचे डिझाइन तयार केले आहे. यानुसार लाकडाच्या 4 इमारती तयार केल्या जातील. यातील एका टॉवरची उंची 100 मीटर असेल. येथे लोकांना सर्वप्रकारच्या सुखसुविधा मिळतील. गार्डन, जिम, रेस्टॉरंट्स, स्काय बार, दुकाने आणि हॉटेल देखील असणार आहे. मुलांना खेळण्यासाठी क्रीडामैदान देखील उपलब्ध असेल.
पर्यावरणस्नेही इमारत
लाकडाद्वारे लवकरात लवकर इमारत निर्माण केली जाऊ शकते. तर काँक्रीट आणि स्टीलद्वारे इमारत उभी केल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असते. जगभरातील एकूण कार्बन उत्सर्जनात 8 टक्के काँक्रीट आणि 5 टक्के स्टीलचे योगदान आहे. जगभरात आता लाकडाच्या बहुमजली इमारती निर्माण केल्या जात आहेत. अमेरिकेच्या मिनेपोलिसमध्ये लाकडाद्वारे 18 मजली इमारत तयार करण्यात आली आहे. याचे नाव होहो टॉवर ठेवण्यात आले आहे. तर स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्येही लाकडाद्वारे उंच इमारत निर्माण करण्यात आली. चीनच्या गुइझोई प्रांतातील यिंगशान शहरातही 24 मजली लाकडी इमारत तयार करण्यात आली आहे.









