इस्रायल स्वत:चे शिष्टमंडळ कतारला पाठविणार : अमेरिकेकडून मध्यस्थी
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यात दुसऱ्या टप्प्याच्या युद्धविरामावर लवकरच चर्चा सुरु होण्याची अपेक्षा आहे. इस्रायलने स्वत:च्या शिष्टमंडळाला युद्धविराम करारावरील चर्चा पुढे नेण्यासाठी कतार येथे पाठविणार असल्याचे सांगितले आहे. तर हमासने देखील इजिप्त अन् कतारच्या मध्यस्थांसोबत युद्धविराम करारावर चर्चा सुरु करण्यावरून सकारात्मक संकेत दिले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील पहिल्या टप्याचा युद्धविराम करार मार्चच्या प्रारंभी संपुष्टात आला आणि आता दुसऱ्या टप्प्यातील करारावर चर्चा होणार आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीत चर्चेचे आमंत्रण स्वीकारल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे, परंतु अधिक माहिती देणे टाळले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात दुसऱ्या टप्प्यातील युद्धविराम करारावर एक महिन्यापूर्वीच चर्चा सुरू होणे अपेक्षित होते.
अमेरिकेने देखील हमाससोबत चर्चा सुरू करण्याबद्दल माहिती दिली आहे. परंतु इस्रायलने अमेरिकेच्या हमाससोबतच्या थेट चर्चेला तीव्र विरोध दर्शविला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचे विश्वासू सहकारी रॉन डेरमर आणि अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी एडम बोहलर यांच्यात या मुद्द्यावर वादही झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओलिसांच्या मुक्ततेसाठी बोहलर यांना स्वत:चा विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे.
मागील आठवड्यात इस्रायलने युद्धविराम कराराचा विस्तार आणि अद्याप हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांच्या मुक्ततेसाठी हमासवर दबाव टाकला होता. परंतु सहमती निर्माण होऊ शकली नाही. हमासच्या ताब्यात अद्याप 24 ओलीस आणि 35 मृतदेह आहेत. इस्रायलने मागील आठवड्यात गाझामधील सर्व पुरवठा रोखत हमासवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.
इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील करारानुसार 25 ओलिसांची मुक्तता करविण्यात आली आणि 8 मृतदेह सोपविले गेले होते. याच्या बदल्यात इस्रायलने सुमारे 2 हजार पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता केली होती. इस्रायलने गाझाच्या बफर झोनमधून स्वत:च्या सैनिकांना माघारी बोलाविल्याने हजारो पॅलेस्टिनी गाझामध्ये परतू लागले आहेत.









