अन्य 12 जणांचाही मृत्यू, प्रशासकीय इमारत उद्ध्वस्त
वृत्तसंस्था/ काबूल (अफगाणिस्तान)
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झालेल्या भीषण स्फोटात तेथील तालिबान सरकारचे स्थलांतर विभागाचे मंत्री रहमान हक्कानी यांचा मृत्यू झाला आहे. स्फोट आयएसआयएस या इस्लामी दहशतवादी संघटनेने घडविल्याचे प्राथमिक अनुमान आहे. त्यात आणखी किमान 12 जणांचे प्राण गेले आहेत.
हा स्फोट हक्कानी यांना मारण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. हक्कानी यांच्यासह त्यांचे 4 अंगरक्षक आणि त्यांच्या आसपास असणारे 8 जण यांनीही जीव गमावला. तालीबानचे आणखी एक मंत्री सिराजुद्दिन हक्कानी यांचे खलीलूर रहमान हक्कानी हे काका होते. काबूल येथील मंत्रालय परिसरात प्रशासकीय इमारतीच्या जवळ हा स्फोट झाला. त्यावेळी हक्कानी हे एका बैठकीत चर्चा करीत होते. स्फोटात इमारत उद्ध्वस्त झाल्याने हक्कानींसह अनेकांचा मृत्यू झाला.
आत्मघाती हल्ला
हा स्फोट दहशतवादी आत्मघाती हल्ला होता, असे स्पष्ट होत आहे. हल्लेखोरही या हल्ल्यात मारला गेला असण्याची शक्यता आहे. रहमान हक्कानी यांचा मृत्यू तालिबानसाठी मोठा धक्का मानण्यात येत असून हे कृत्य पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचेही असू शकते, असे मानले जात आहे. हक्कानी हे तालिबान प्रशासनातील महत्वाच्या मंत्र्यांपैकी एक होते. ते ज्या इमारतीत बैठक घेत होते तेथेच दबा धरून बसलेल्या आत्मघाती दहशतवाद्यांने त्याच्या अंगावरच्या स्फोटकांचा स्फोट केला. त्यात हक्कानी यांचाही जागेवरच मृत्यू झाला.
परिसरात पळापळ
स्फोटाचा धमाका ऐकू येताच मंत्रालय परिसरात सर्वत्र पळापळ झाली. थोडी चेंगराचेंगरीही झाली आणि यीत काही लोक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी मृतांची संख्या यापेक्षा मोठी असू शकते. कारण अद्याप तालिबान प्रशासनाने ही संख्या नेमकी किती हे घोषित केलेले नाही. या स्फोटात अनेकजण जखमीही झाले असून त्यामुळेही मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
2021 पासून मंत्रिमंडळात
खलीलूर रहमान हक्कानी यांचा समावेश तालिबान मंत्रिमंडळात स्थलांतरितांचे कार्यवाहक मंत्री म्हणून 2021 मध्ये करण्यात आला होता. कार्यक्षम मंत्री आणि तुलनेते नेमस्त व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. अफगाणिस्तानातील विविध टोळ्यांच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्यातील हिंसक संघर्ष थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी त्यांच्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
तालिबानकडून निषेध
तालिबान प्रशासनाने हक्कानी यांच्या हत्येचा निषेध केला असून अफगाणिस्तानातील सरकार अस्थिर करण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप केला. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नसली तरी पाकिस्तान समर्थित संघटना यामागे असू शकते. सर्व शक्यता गृहित धरुन तपास केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.
हक्कानी नेटवर्क काय आहे…
हक्कानी नेटवर्क हा अनेक दहशतवादी संघटनांचा एक समूह असून तो सैनिक तुकड्या आणि विदेशी संस्थांवर हल्ले करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, अफगाणिस्तानात तालिबानच्या हाती सत्ता आल्यानंतर हे नेटवर्क तालिबानच्या सरकारचा भाग बनले आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैनिकी तळांवर हल्ले करण्यासाठी कुख्यात असलेल्या या नेटवर्कचे चार मंत्री सध्या तालिबान मंत्रिमंडळात आहेत. या नेटवर्कचे पाकिस्तानातील दहशतवादी गटांशी संबंध आहेत. त्यामुळे अमेरिकेने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानवरही दबाव आणला होता.









