बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लक्ष क्रिकेट अकादमी ब संघाने टॅलेन्ट स्पोर्ट्स ब चा 1 गड्यांनी तर विलास बेंद्रे क्रिकेट अकादमीने बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब चा 83 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. आदित्य शानभाग, नरेंद्र मांगोरे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आरआयएस हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात विलास बेंद्रे क्रिकेट अकादमीने 49.1 षटकात सर्व बाद 222 धावा केल्या. शिवू एन.ने 2 षटकार 10 चौकारांसह 70, शशांक कल्लूरने 4 चौकारांसह 31, बसवराज हुब्बळीने 2 षटकार 3 चौकारांसह 29, हर्षित पै ने 5 चौकारांसह 23, संजय व राहुल माने यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे ध्रुव देसाई, साई कारेकर व अशुतोष हिरेमठ यांनी प्रत्येकी 2 तर सिद्धाप्पा पुजेरी, अर्णव कुंदप, ओमकार देशपांडे यांनी प्रत्येकी गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा डाव 31 षटकात सर्व बाद 139 धावांत आटोपला. शिवम नेसरीकरने 2 षटकार 6 चौकारांसह 57, अर्णव नुगानट्टीने 5 चौकारांसह 23 तर आशुतोष हिरेमठने 12 धावा केल्या. विलास बेंद्रेतर्फे आदित्य शानभागने 19 धावांत 5, दर्शन चव्हाणने 17 धावांत 3, बसवराजने 1 गडी टिपला. केएससीए बेळगाव मैदानावर टॅलेन्ट स्पोर्ट्स क्लब अ ने 50 षटकात 9 बाद 229 धावा केल्या. देवराज कोठीने 2 षटकार, 14 चौकारांसह नाबाद 98, प्रवीण कोटियानने 50, जॉय सोल्लदने 20 धावा केल्या. लक्ष क्रिकेट अकादमीतर्फे प्रज्वलने 46 धावांत 3, विजयकुमार पाटीलने 36 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लक्ष क्रिकेट अकादमी ब ने 49.3 षटकात 9 गडी बाद 233 धावा करुन सामना जिंकला. नरेंद्र मांगोरेने 8 चौकारांसह 50, आसीफ मुल्लाने 6 चौकारांसह 43, अमित यादवने 1 षटकार 9 चौकारांसह 60, क्रांतीकुमार व केदारनाथ यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. टॅलेन्टतर्फे निश्चित हारगुडेने 34 धावांत 4, रवीकुमार साखरीने 41 धावांत 3 गडी बाद केले.









