पुणे / प्रतिनिधी :
तलाठी पदभरतीचा पेपर फुटीचा प्रकार समोर आल्याने आता ही परीक्षा रद्द करून यापुढे नवीन परीक्षा केवळ टीसीएसच्या अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून करण्यात आली आहे.
तलाठी भरतीसाठी राज्यात दहा लाख अर्ज आले असून लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात लाटले गेले आहे. तलाठी पदभरतीत होऊ शकणाऱ्या संभाव्य गैरप्रकाराबाबत राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त व कार्यकारी संचालक, भूमी अभिलेख विभाग,पुणे यांना समितीच्या वतीने निवेदन दिले होते, याकडे लक्ष वेधून समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे म्हणाले, टीसीएस कंपनीला परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मोबाईल जॅमर बसविण्यास सांगितले जाईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. परंतु परीक्षा केवळ टीसीएस केंद्रावर घेण्याबाबत अधिकार नसल्याचे उत्तर आम्हाला दिले गेले होते. तलाठी पदांची जाहिरात निघण्यापूर्वीच आम्ही महसूल विभागाला भरती प्रक्रियेत घडू शकणाऱ्या संभाव्य गैरप्रकाराबाबत अवगत करुन इशारे दिले होते. परंतु महसूल विभागाने आमच्या उपाययोजनांकडे कानडोळा केला. आमच्या सूचना अंमलात न आणल्याने नाशिक जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षेचा पेपर सुरू असतानाच पेपर फुटीचा प्रकार समोर आला. त्याचसोबत राज्यातील इतर जिल्हयात देखील पेपर फुटला गेला. परीक्षा केंद्राबाहेर गेलेली प्रश्नपत्रिका नक्की किती घोटाळेबाजांपर्यंत पाहोचली, याबाबत सद्या काही सांगता येणार नाही. तसेच ज्या परीक्षा केंद्रावर हाय टेक पेपर फोडणारे पकडले गेले नसतील त्यांचे काय? कुचकामी उपाययोजनांद्वारे पेपर फोडणाऱ्यांना रोखता येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे परीक्षा पद्धती व उपाययोजना सदोष असल्याने परीक्षा पारदर्शक पार पडणार नाही. त्यामुळे 17 ऑगस्टपासून सुरू झालेली परीक्षा त्वरीत रद्द करावी व उर्वरीत सर्व परीक्षा नवीन उपाययोजना अंमलात आणून नव्याने घेण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.








