काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर यांचा टोला
प्रतिनिधी/ पणजी
कर्नाटकातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने दिलेला कौल म्हणजे कोणताही पक्ष मतदारांना गृहित धरू शकत नाही याचे ज्वलंत उदाहरण आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पक्षाच्या प्रचारापेक्षा स्व:प्रसिद्धी करण्यावरच जास्त भर दिला. त्यांनी आजपर्यंत दिलेली बहुतेक आश्वासने ही खोटारडी होती. तोच खोटारडेपणा त्यांना आणि पर्यायाने भाजपला महागात पडला. असे परखड मत काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी व्यक्त केले आहे.
कर्नाटकात काँग्रेसने दमदार यश मिळविल्याबद्दल पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत लोकांना केवळ आश्वासनेच दिली. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख ऊपये जमा करण्यापासून त्यांच्या आश्वासनांची सुरूवात झाली होती. महागाई कमी करण्याच्या नावाखाली भाजपने आतापर्यंत महागाई वाढवण्यातच धन्यता मानली. आज गॅस सिलिंडर विकत घेणे सर्वसमान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचले आहे, तरीही या सरकारला त्याचे काहीच पडलेले नाही. त्या सर्वांचे परिणाम म्हणून भाजपला विदारक हार सहन करावी लागली, असे पणजीकर म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी बोलताना, देशात हुकुमशाही चालत नाही, त्याचबरोबर तोडा आणि फोडा चे राजकारणही चालत नाही, हेच कर्नाटकातील निवडणूक कौलातून स्पष्ट झाले आहे. तेथील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. ही परंपरा यापुढेही चालूच राहणार आहे, असे ते म्हणाले.
भगवान के घर देर है अंधेर नहीं : एल्टन
कर्नाटकाने दिलेला जनादेश म्हणजे प्रत्येकासाठी स्पष्ट संदेश आहे. त्याचबरोबर विश्वासघात करणाऱ्या आणि पक्षांतर करणाऱ्यांसाठी हा महत्वाचा संकेत आहे, असे मत केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी व्यक्त केले.
भाजपने ’द स्टोरी ऑफ कॉमन मॅन’ वर लक्ष केंद्रीत करावे : युरी
कर्नाटकात विधानसभा निवणुकीत काँग्रेसच्या ’न भूतो’ विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजपने आता ’द स्टोरी ऑफ कॉमन मॅन’ वर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगावला आहे. त्याचबरोबर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ’द कर्नाटक स्टोरी’ हे कथानक असेल असेही त्यांनी म्हटले आहे. काल्पनिक कथानकांवर आधारीत सिनेमा बघण्यापेक्षा जनतेच्या हाल अपेष्टांकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे कर्नाटकच्या निकालाने स्पष्ट झाले आहे असे युरी आलेमाव म्हणाले. या निकालाने राजकारणाला नवी दिशा मिळणार असून आगामी काळातही काँग्रेस अग्रेसर राहील.









