प्रतिनिधी/ सातारा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला राज्यघटना दिली तसेच त्यांनी घालून दिलेला आदर्श आपण पुढे नेला पाहिजे. त्याचबरोबर राज्य व देश प्रगतीपथावर नेणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती राज्यासह देशात साजरी होत आहे. जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महामानवास अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. त्याच्यावरच आपल्या देशाचा राज्यकारभार चालत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व इतर घटक राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांवर काम करत आहेत. आंबेडकरांनी घालून दिलेल्या आदर्शांचे तंतोतंत पालन कऊन आपले राज्य आणि देश प्रगतीपथावर नेण्याचे काम करू, हीच त्यांना अभिवादन ठरेल, असेही मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
साताऱ्यात अवतरलं निळं वादळ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा, कराड शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध संघटनांतर्फे अभिवादनपर कार्यक्रम झाले. त्याचबरोबर विविध कार्यालयातही डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन कऊन अभिवादन करण्यात आले. सातारा, कराडमध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती. यामध्ये हजारो अनुयायी सहभागी झाले होते. त्यामुळे जणु काही निळं वादळ अवतरल्याचा भास जाणवत होता.








