शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी झंझावाती दौरे करून वातावरण निर्मिती केली. आता मित्रपक्षांची शंका खोटी ठरवत शरद पवारांचे दौरे सुरू झालेत. ‘तुम्ही भाजप विरोधी मतांवर निवडून आलात, तेच लोक धडा शिकवतील’ असा पवार बंडखोरांना इशारा देत आहेत. पवारांना पिता, देव मानणाऱ्यांवर उत्तरसभा घेण्याचा दबाव आहे. जो राष्ट्रवादी बंडखोरांच्या अंगलट येऊ शकतो.
शिवसेना फुटली तरी ठाकरेंना जनाधार आहे, राष्ट्रवादी फुटली तरीही पवारांच्या मागे गर्दी आहे, काँग्रेस नेते फुटले तरी त्यांच्या पक्षाच्या मतदारांमध्येही फार बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा स्थितीत राज्यात महाविकास आघाडी आजपर्यंत तरी आपले अस्तित्व टिकवून राहिली आहे. इतके मोठे दणके बसूनसुद्धा या परिस्थितीत फारसा बदल होत नाही. हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या प्रत्येक टीकेला टोकाला जाऊन ते उत्तर देऊ लागले आहेत. आपण प्रस्थापित आहोत आणि निवडणूक यशस्वी करणारी सगळी हितसंबंधी मंडळी आपल्याकडे आहेत हे माहीत असूनही त्यांना यशाची खात्री मिळेना. शिवाय त्यांच्यातील मतभेद लपलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी भोजनाद्वारे अनेक मंडळींना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जी चलबिचल विरोधकांमध्ये व्हायला पाहिजे ती सत्ताधाऱ्यांतच होत आहे. हे एक वेगळेच चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.
राज्यातील राजकारणात बरीच उलथापालथ सुरू आहे. पण सर्व काही ठीक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न मात्र राजकीय नेते अगदी सहजपणे करत आहेत. सरकारने अधिवेशन पार पाडले पण मंत्रिमंडळाचा शिंदे गटाला अपेक्षित होता तसा विस्तार होऊ शकला नाही. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सरकारी कार्यक्रमही व्यवस्थित पार पाडत आहेत. ‘सरकार आपल्या दारी’च्या माध्यमातून विरोधकांवर टीकेची संधीही साधली आहे. आम्ही फेसबुकवरून नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारे असे मुख्यमंत्री सांगत आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपला मुख्यमंत्रीपदावर डोळा नाही असेही सांगावे लागत आहे. देवेंद्र फडणवीस आम्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या पदावर डोळा आहे. पण, तो सरकार बळकट ठेवण्यासाठी… असे बोलून धमाल उडवून देत आहेत. शिंदे गटाचे आमदार मात्र दिवसेंदिवस अस्वस्थ होत आहेत. संभाजीनगरच्या शिरसाटांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना सक्तीने दवाखान्यात दाखल करण्याची भाषा केली तर रायगडच्या गोगावलेंनी आता कोणाची बायको काय करेल आणि कोण नेता कोणाला संपवेल या विचाराने दिलेल्या मंत्रीपदाच्या गोष्टींचे स्फोट सुरु केले आहेत.
नाही म्हणायला, विरोधकांच्याही तंबूमध्ये काही दिवस शरद पवारांच्या कृतीने खळबळ माजली होतीच. उद्योगपतीच्या घरी पवार काका पुतणे भेटले आणि त्यामुळे चर्चेला उधाण आले. दोघांकडून खुलासा झाला तरी लोकांचे समाधान झाले नाही. पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पण, केवळ खुलाशावर निभावणार नाही हे लक्षात आलेल्या पवारांनी आपल्या बीडच्या दौऱ्यात भूमिका अगदीच स्पष्ट करून टाकली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिह्यात भुजबळांच्या मतदारसंघात झालेल्या दौऱ्यानंतर पवारांचा बीडचा दौरासुद्धा प्रचंड चर्चेत आहे. धनंजय मुंडेंसह पक्षातील प्रमुख मंडळी सोडून गेलेली असताना जुन्या माजी आमदारांची फौज घेऊन पवार मैदानात उतरले. वैशिष्ट्या म्हणजे या दौऱ्यात तरुणांची मोठी गर्दी होती. धनंजय मुंडेंना विरोध करेल असा व्यक्तीही त्यांना मिळाला. जिह्यात क्षीरसागर परिवारातील तरुणाला त्यांनी नेतृत्वही बहाल केले. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात होता तशा पातळीला आता हा संघर्ष पुन्हा पोहोचला आहे. पण यावेळी युवा मुंडेंवर पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का आहे. आधी त्यांना पवारांच्या टीकेला उत्तर देणे मुश्किल झाले. पण, भुजबळांच्या नंतर त्यांनीही उत्तरसभा घेण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. हे प्रकरण मात्र त्यांच्या अंगलट येऊ शकते. एक तर या सर्व नेत्यांनी पवारांना वडील किंवा देवाची उपमा दिलेली आहे. त्यांचा फोटो हटवणार नाही आणि पक्षाचे नावही बदलणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. अशा स्थितीत उत्तर सभेत ते पवारांवरच टीका करू लागले तर पित्याला उलट उत्तर दिल्याची भावना त्यांच्या विरोधात काम करु शकते. 2019 मध्ये त्याचा प्रत्यय आलेला असल्याने ही उत्तरसभा अंगलट येणार हे निश्चित आहे. भुजबळांनी एकदा बाळासाहेबांवर टीका करून पराभव पदरी घेतलेला आहे. आता येवल्याच्या सुरक्षित मतदारसंघात त्यांची पुन्हा परीक्षा आहे. अजित पवार यांनी पवारांना वय झाले याची आठवण करून दिली आणि काही काळातच पुन्हा त्यांच्या आशीर्वादासाठी जावे लागले. त्यामुळे वळसे पाटील सावध बोलले. आता धनंजय मुंडेंवर ही वेळ पवारांनी आणली आहे. तिथून ते कोल्हापूरला जाणार आहेत. तिथेही जुनी मंडळी तयारीला लागली आहेत. माणसं मिळवण्यात पवारांची हातोटी आहे. त्यात ते आपला मतदार आपल्याजवळच राहील आणि बंडखोरी करून भाजप बरोबर गेलेल्यांची विधानसभेची लढाई भाजप विरोधीच होती याची आठवण करून देत आहेत. हा विरोधात गेलेल्या आपल्याच तंबूत पवारांनी पेरलेल्या सुरुंग आहे. एकीकडे जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस देऊन पाटलांना सत्ताधाऱ्यांनी हादरा दिला आहे. दुसरीकडे पवार यांना हादरा देत आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग आधीच पवारांबाबतीत संभ्रमात आहेत. त्यात अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांनाही राहिलेल्या आठ महिन्यात ही रिस्क घ्यायची का? याचा फेरविचार करायला पवार भाग पाडू लागले आहेत. शिवसेनेपेक्षा ही एकदम वेगळी परिस्थिती आहे. ज्या राष्ट्रवादीतील शिलेदार आपण स्वत:च्या जीवावर निवडून येतो म्हणतात, तिथे निर्माण झालेली ही चलबीचल आहे. त्यामुळे भाजप, शिंदेसेनेतही संभ्रम वाढला आहे. पवारांबाबत काँग्रेसचे शब्द मात्र बदललेले आहेत. अशोक चव्हाण यांनी पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. याच आठवड्यात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार अशा चर्चा उठवल्या गेल्या. मात्र पवारांना घेतल्याशिवाय आपण मोठे यश मिळवू शकत नाही याची त्यांनाही जाणीव आहे. वारंवार तेच सत्य पुढे येते आहे की, आतापर्यंत राज्यातील प्रत्येक पक्षाची स्वत:ची मतांची एक ठराविक टक्केवारी आहे आणि त्यात फारसा बदल होताना दिसत नाही… परिणामी गोंधळही संपत नाही.
शिवराज काटकर








