कॅटनॅपमध्ये कंपन्यांकडून कर्मचाऱयांना झोप घेण्याची सूचना
ऑफिसमध्ये काम करताना डोळा लागल्यास थट्टेचा विषय ठरतो, तसेच नोकरी जाण्याचीही भीती असते. परंतु आता अनेक कंपन्या स्वतःहून कर्मचाऱयांना मध्येमध्ये छोटी झोप घेण्यास सांगत आहेत. काही कंपन्या याकरता वेळ निश्चित करत आहेत, तर काही कंपन्या झोप घेता येईल अशी जागा निर्माण करत आहेत. या झोपमुळे कामाचे नुकसान होणार नाही तर उत्पादकता वाढणार असल्याचे नासाचे म्हणणे आहे.

नॅप म्हणजेच काही मिनिटांपासून 45 मिनिटांपर्यंतची झोप घेण्याचे अनेक फायदे आहेत, विशेषकरून दुपारी झोप घेतल्यास अधिक फायदे होतात असे नासाने स्वतःच्या एका अध्ययन अहवालात म्हटले आहे.उड्डाणापूर्वी सुमारे 25 मिनिटांची झोप घेणारे वैमानिक प्रवासादरम्यान अधिक दक्ष असतात आणि सुमारे 34 टक्के अधिक चांगली कामगिरी दाखवत असल्याचे अंतराळ संस्थेलला एका प्रयोगादरम्यान आढळून आले.
10 मिनिटांपासून अर्ध्या तासापर्यंतचा नॅप पुरेसा असल्याचे नासाचे म्हणणे आहे. याहून अधिक वेळ झोपल्यास माणूस काही वेळ सुस्तावून जातो आणि कमी दक्ष राहतो. यामुळे कामाचे नुकसान होते, याच छोटय़ाशा झोपेला कॅटनॅप म्हटले जात आहे.

कॅटनॅप शब्द आला कुठून?
कॅटनॅप शब्दाचा इतिहास कोणता हे कुणालाच माहिती नाही. हा शब्द कदाचित मांजरांवरून प्रेरित असावा. मांजर दिवसभर छोटीछोटी झोप घेत असते आणि तितकेच सतर्क असते. जुन्या काळात जहाज चालविणारे किंवा जहाजावर काम करणारे स्वतःच्या कंबरेला एका चाबकाप्रमाणे पट्टी बांधायचे. चामडं आणि धातूने तयार ही पट्टी सातत्याने टोचत असल्याने लोक सतर्क राहायचे. जहाजावर कुठलीच दुर्घटना होऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱया या पट्टीला कॅट-ओ-नाइन टेल्स म्हटले जायचे.
जपानमध्ये प्रमाण अधिक
जगभरातील कंपन्या आता कॅटनॅपच्या फायद्यांबद्दल बोलत आहेत. परंतु जपान यात सर्वात पुढे आहे. तेथे याकरता इनेमुरी ही संकल्पना प्रचलित आहे. याचा अर्थ कामादरम्यान झोपणे असा होतो. जपानच्या कुठल्याही ऑफिसात दुपारी तेथे डेस्कवर झोपलेले लोक दिसून येतात. लोक शॉपिंग सेंटर, डिपार्टमेंटल स्टोअर, कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि मेट्रोतही झोपलेले दिसून येतील. डुलकी घेणारे लोक तेथे आळसी नव्हे तर मेहनती मानले जातात.









