22 एप्रिल रोजी प्रथेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे पोलीस आयुक्त एम. बोरलिंगय्या यांचे आवाहन
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाने सालाबादप्रमाणे 22 एप्रिल रोजी शिवजयंती साजरी करावी. प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी उद्यान येथे सकाळी शिवजयंती साजरी करावी आणि चित्ररथ मिरवणूक निवडणुकीनंतर काढावी, अशी विनंती पोलीस आयुक्त एम. बोरलिंगय्या यांनी केली आहे. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाने बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली व शिवजयंती उत्सव व चित्ररथ मिरवणूक याबद्दल माहिती देऊन परवानगी मागितली. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी चित्ररथ मिरवणूक पुढे काढावी, अशी विनंती केली. तिथीनुसार पारंपरिक पद्धतीने होणारा शिवजयंती उत्सव 22 एप्रिल रोजी शिवाजी उद्यान येथे करावा. तसेच सर्व शिवजयंती मंडळांनी आपापल्या परिसरात शिवजयंती साजरी करावी. सध्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मिरवणूक काढता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच चित्ररथ मिरवणूक ही भव्यदिव्य असते. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातून निरीक्षक बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. मिरवणूक काढली तरी त्यावर वेळ मर्यादा येईल आणि मंडळांचा हिरमोड होईल. त्याऐवजी निवडणुकीनंतर नेहमीप्रमाणे भव्यदिव्य अशी चित्ररथ मिरवणूक काढावी, अशी सूचनाही पोलीस आयुक्तांनी केली. याप्रसंगी मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, मदन बामणे, नेताजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









