प्रकल्प संचालकांकडे मागणी : शेतकऱयांना नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकारी-संबंधितांची लवकरच बैठक : प्रमोद कोचेरी यांच्याकडून पाठपुरावा
खानापूर : बेळगाव-गोवा रस्ता चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. करंबळजवळ नव्याने पुलाचे बांधकाम काही दिवसांत पूर्ण होणार आहे. हलकर्णी गावाला जोडणारा सर्व्हिस रस्ता तसेच होनकलसाठी जाणाऱया सर्व्हिस रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांना धारवाड येथील त्यांच्या कार्यालयात भेटून निवेदन दिले.
राजा टाईल्स फॅक्टरी येथील रेल्वेरुळापासून हलकर्णी गावापर्यंतच्या सर्व्हिस रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. त्यामुळे हलकर्णी येथील नागरिकांना गावाबाहेर जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. यासाठी हा रस्ता तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच होनकल येथील भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. मात्र, हेही काम अर्धवट ठेवल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे.
अभियंत्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना
कंत्राटदार व अभियंत्याने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रमोद कोचेरी यांनी शिष्टमंडळाला घेऊन धारवाड येथील प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांना भेटून येथील परिस्थितीची सविस्तर माहितीसह फोटो सादर केले. हे काम तात्काळ पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी त्यांनी लगेच या विभागाचे अभियंते किरण यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून हे काम तात्काळ सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना केल्या.
या दोन्ही गावांच्या सर्व्हिस रस्त्यासाठी खासदार अनंतकुमार हेगडे व इराण्णा कडाडी यांनी प्रयत्न करून हा रस्ता मंजूर करून घेतला आहे. यासाठी प्रमोद कोचेरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता हा रस्ता पूर्णत्वास जाणार असल्याने होनकल व हलकर्णी गावच्या नागरिकांची चांगली सोय होणार आहे. यावेळी शंकर चौगुले, प्रवीण पाटील, पी. एच. पाटील, शेखर बेळगावकर उपस्थित होते.
या रस्त्यासाठी ज्या शेतकऱयांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना नुकसानभरपाई तात्काळ मिळावी, यासाठीही प्रकल्प संचालकांना सूचना करण्यात आल्या असून शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळण्यात कोणताही त्रास होणार नाही. त्यांना योग्य नुकसानभरपाई लवकर मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱयांची लवकरच बैठक घेऊन नियोजन करण्यात येईल, असे श्रीकांत पोतदार यांनी सांगितले.
शहरातून जाणाऱया रस्त्याचा विकास होणार
राजा टाईल्स फॅक्टरी ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या खानापूर शहरातून जाणाऱया रस्त्याचा विकास होणार असल्याचे प्रमोद कोचेरी यांनी सांगितले. वनटाईम डेव्हलपमेंट या योजनेतून हा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी टेंडरही काढले असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लगेचच शहरातील रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गोवा रस्त्याबरोबरच शहरातील रस्ताही चौपदरी होणार असल्याने वाहतुकीची चांगलीच सोय होणार आहे. आता असलेल्या या रस्त्याचे पुन्हा रुंदीकरण होणार असल्याने याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, वनटाईम डेव्हलपमेंट या योजनेतून हा रस्ता करण्यात येणार आहे.









