खानापूर : तालुक्यातील नंदगड येथे खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या खतविक्री केंद्रातून जादा दराने खत विक्री होत असल्याची तक्रार कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या खतविक्री केंद्रावर कृषी अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली होती. याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांना देण्यात आले. नंदगड मार्केटिंग सोसायटीच्यावतीने खते, बी. बियाणे व शेती माल विक्री करण्यात येतो. या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य भावात शेतीचे साहित्य मिळावे असा हेतू असताना मागील वर्षापासून या ठिकाणी चढ्या भावाने खत तसेच इतर शेती अवजारे विकली जातात. याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेऊन नुकतीच मार्केटिंग सोसायटीच्या खतविक्री केंद्रावर कारवाई करण्यात आली होती. सेक्रेटरीना याबाबत नोटीस देवून खतविक्री थांबवण्यात आली होती.
सोसायटीतील गैरव्यवहाराची चौकशी करा
याबाबत समितीचे कार्यकर्ते रुक्माण्णा झुंजवाडकर यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन नंदगड मार्केटिंग सोसायटीत चाललेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच भविष्यात या ठिकाणी योग्य भावाने खत तसेच शेतीपूरक अवजारे योग्य भावाने विकण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन यावेळी डी. बी. चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, यशवंत बिरजे, नारायण कापोलकर, आबासाहेब दळवी, रमेश धबाले, शंकर गावडा, नागेश भोसले यासह इतर कार्यकर्ते सहभागी होते.









